शहरात लवकरच नव्या 12 टोईंग व्हॅन

0

नाशिक । दि.31 प्रतिनिधी
शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीसांकडून विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. नो पार्कींगमध्ये पार्क केलेली वाहने हटवण्यासाठी लवकरच 12 अत्याधुनिक नवीन टोईंग व्हॅन वाहतुक विभागात दाखल होणार आहेत.

तसेच वाहने उचलण्यापूर्वी त्या वाहनांचे फोटोग्राफ्स घेण्यासह व्हिडीओ शुटींग देखील केली जाणार आहे.

शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. प्रामुख्याने रोडच्या कडेला कशीही पार्किंग केलेली वाहने यास प्रामुख्याने जबाबदार आहेत. बहुतांश परिसरातील पार्कींगची ठिकाणे गायब असून, वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात.

मात्र, बेशिस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातासारख्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी टोईंग व्हॅन सुरू करण्यात आली होती. मात्र, या टोईंग व्हॅन एकदम साध्या असल्याने महागड्या चारचाकी वाहनांचे प्रंचड नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. यामुळे दुसर्‍यांदा सुरू झालेले हे कामही अवघ्या काही महिन्यात बंद झाले होते. दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले.

मात्र, यात देखील अप्रशिक्षीत कर्मचारी दुचाकी हाताळताना नुकसान करीत असल्याचे वारंवार समोर आले. सध्या, चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी दोन वेगवेगळी वाहने ठेकेदाराने नियुक्त केली आहेत.

मात्र, यात आधुनिकतेचा अभाव असून, वाहने उचलण्याची क्षमता फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रमाणे यंत्रणा राबवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतला होता.

अत्याधुनिक साधनांमुळे वाहनचालकाचे नुकसान होत नाही. तसेच, टोईंग व्हॅनची संख्या मुबलक असल्यास रस्त्यावर वाहने पार्क झाल्याबरोबर कारवाई होऊ शकते. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी चार तर तीन चाकी आणि दुचाकींसाठी आठ वाहनांचा समावेश आहे.

या टोईंग व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार असून, कोणतेही वाहन उचलण्यापूर्वी कर्मचार्‍यांना तेथील व्हिडीओ शुटींग घ्यावे लागणार आहे. तसेच, फोटोग्राफ्स देखील काढावा लागणार आहे.

हा डेटा जवळपास दोन महिने जतन करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे सोपवण्यात आली आहे. अनेकदा वाहन उचलण्यात आल्यानंतर वाहनचालक आपले वाहन सदर ठिकाणी नव्हतेच असा दावा करतो.

अशा वेळी हे फुटेज उपयोगी पडणार आहे. यामुळे वादाचे प्रसंग टाळता येतील. तसेच, ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांना देखील आळा बसेल, अशी शक्यता आहे.

याबाबत एक टेंडर प्रसिध्द झाली असून, पुढील महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

या बाबत पोलिस आयुक्तालयात 31 जुलै रोजी एक बैठक पार पडणार आहे. आणखी काही तांत्रिक कामे आटोपल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी ठेकेदाराचा अंतिम निर्णय अभिप्रेत आहे.

या टेंडरमधील अटी शर्तीं ठरवताना नवी मुंबईतील टोईंग व्हॅनचे काम कसे चालते, याचा अभ्यास शहर पोलिसांनी केला आहे. नवीन ठेकेदारास एकूण 12 अत्याधुनिक वाहने पुरवावी लागणार आहेत.

यातील चार वाहने चारचाकी वाहनांसाठी वापरण्यात येणार आहेत. तर उर्वरीत आठ वाहने चार विभागांना देण्यात येतील. नवीन येणारी वाहने आधुनिक आहेतच पण यावर प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.

दरम्यान, दुचाकी उचलण्यासाठी हायड्रोलिक प्लॅटफार्मचा वापर होणार असून, यामुळे दुचाकींची आदळआपट कमी होण्यास मदत होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*