Photo Gallery : पांडवलेणी परिसरात नाशिक पोलिसांनी वाचवले दोघा ट्रेकर्सचे प्राण

0
नाशिक | पांडवलेणी येथे ट्रेकिंग करताना पाय घसरून पडलेल्या दोघा ट्रेकर्सचे प्राण जागरूक नागरिक, पोलीस आयुक्त व आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने आज वाचवले.

अरविंद वैद्यनाथन (वय २२, रा. प्रभूधाम, एचएएल जवळ, ओझर), विदुला दौलत पगार (वय १९, रा. पिंपळगाव बसवंत) अशी या घटनेत जखमी झालेल्या ट्रेकर्सची नावे आहेत.

पांडवलेणी येथे ट्रेकिंग करण्यासाठी गेलेल्या नितीन देशपांडे, प्रवीण वाकोले व अजय जाधव यांना आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. मुलगी मदतीसाठी विनवण्या करत होती. त्यांनी जवळ जाऊन पहिले असता लेणी क्रमांक १ समोर २० ते २५ फुट खोल जखमी अवस्थेत एक युवक व युवती पडल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांना याची माहिती दिली.

माहिती मिळतात आयुक्तांनी जलद प्रतिसाद पथक यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आर नलावडे, उपनिरीक्षक एस यु हिरे यांच्यासह १९ जणांच्या पथकाने पांडवलेणी येथे पोहोचून दोघांची सुटका केली.

त्यांना स्ट्रेचरच्या सहाय्याने उचलून पायथ्याशी आणले. याठिकाणाहून १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आयुक्त व त्यांच्या जलद प्रतिसाद पथकाने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*