Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : आडगाव पोलिसांच्या ‘या’ कृतीने तुम्हालाही अभिमान वाटेल; वाचा काल रात्री दहाला काय घडले साधूग्राममध्ये?

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य.  याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत असा होतो. नेहमीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करताना नजरेस पडतात. चांगली सेवा देण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नेहमीच होत असतो; मग ती सेवा कुठलीही असो…

सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी तत्परता दाखवल्यानंतर कौतुकाची जी छाप पाठीवर पडते त्यासारखी उर्जा जगात कुठलीही नसल्याचे म्हटले जाते.  नाशिकमध्येही काल (दि.३०)  अशाच एका घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा सुरु असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

घडले असे की, साधुग्राममध्ये गेल्या काही दिवसांपासून श्री श्री रविशंकर यांच्या सत्संगाचा कार्यक्रम सुरु होता. नेहमीप्रमाणे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी चारचाकी पार्क करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महाराष्ट्रीयन मात्र, सध्या विदेशात स्थायीक असलेल्या महिला भाविक आपल्या कारजवळ गेल्या मात्र, कार सुरु होत नव्हती. परिसरात प्रचंड अंधार, कार सुरु होत नाही यामुळे या महिला भाविक प्रचंड घाबरल्या होत्या.

याच परिसरातून मुनीर काजी आणि लखन नावाचे दोन आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस वाहनातून गस्त घालत होते. त्यांच्या लक्षात सदरची बाब आली. रात्रीचा वेळ, महिलांची सुरक्षितता याची गांभीर्यता लक्षात घेत दोघेही या महिलांच्या मदतीला धावून गेले.

कारची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाल्यामुळे धक्का मारल्याबिगर पर्याय नव्हता. त्यामुळे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी या परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांची मदत मागण्यास सुरुवात केली. याच वेळी या परिसरातून सत्संगाला आलेले शहरातील वकील बिपीन शिंगाडा आणि त्यांचे मित्र सुरेश भावसार जात होते. त्यांना या पोलीस कर्मचाऱ्यांनी हात करत मदतीचे आव्हान केले.

घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वकाही बाजूला ठेवत गाडीला धक्का मारण्यास सुरुवात केली. दोन-तीन चक्कर टाकल्यानंतरही गाडी काही सुरु होत नव्हती. दरम्यान, मुनीर काजी याने महिलेला कारमध्ये बसण्यास सांगून बोनेट उघडत बॅटरी तसेच इतर काही गोष्टी करून बघितल्या. करंट इंजिनपर्यंत पोहोचावे यासाठी दगडाने घासून बघितले. मुनीर यांचा हा प्रयोग यशस्वी झाला; गाडी सुरु झाली व महिला भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानत तोंडभरून कौतुक केले.

याच वेळी शिंगाडा यांनीदेखील या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत नेहमीच पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्न उठवले जातात, मात्र आजची ही घटना बघून मलादेखील पोलिसांच्या प्रती अभिमान असल्याचे उद्गार त्यांनी काढले. तसेच पोलिसांच्या या कामाची दखल त्यांच्या पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी प्रयत्नही केले.


पोलीस आयुक्तांचा दुसऱ्या मिनिटाला रिप्लाय

रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास मी पोलीस आयुक्तांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज कशी शाबासकी मिळवली याची माहिती देण्यासाठी एक संदेश लिहिला. रात्रीचे ११ वाजून ४७ मिनिटे झाली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना संदेश पाठवतच त्यांनी तो दुसऱ्या मिनिटाला वाचलाही होता. तसेच घटनेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मानून आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांचा गौरव करणार असल्याचा शब्दही मला दिला. पोलीस आयुक्तांची तत्परता जशी दिसली तीच तत्परता दोन्ही कर्मचाऱ्यांच्या अंगात मला दिसून आली.

बिपीन शिंगाडा, विशेष सरकारी वकील नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!