वाहन थांबविण्यास मज्जाव केल्याने पोलिसाला मारहाण; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहन थांबविण्यास मज्जाव केल्याने पोलिसाला मारहाण; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवीन नाशिक | प्रतिनिधी

पवननगर येथील भाजी मार्केटच्या बाहेर वाहन उभे करू दिले नसल्याचा राग आल्याने एका युवकाने पोलिसांना मारहाण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे ठिकठिकाणी पोलिसांची गस्त आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नवीन नाशकतील उत्तमनगर, पवननगर आणि त्रिमूर्ती चौक भागात विनाकारण रस्त्यावर कोणी फिरणार नाही, भाजीबाजारा जवळ गाड्या उभ्या करणार नाही याची दक्षता घेण्यात येत होती.

अंबड पोलीस ठाण्याचे सेवक संदीप दिलीप भुरे हे आयुक्तालयातर्फे नेमुन देण्यात आलेल्या आठ दहा विशेष पोलीस अधिकाऱ्यांसोबत परिसरात कर्तव्य बजावत होते. यावेळी पवननगर भाजी मार्केटच्या बाहेर चेतन निंबा गोसावी (३४, रा. उंटवाडी) याने गाडी उभी केली त्यावेळी भुरे यांनी ही गाडी या ठिकाणी उभी करू नका अशी सूचना केली.

मात्र, या गोष्टीचा चेतन यास राग आल्याने त्याने थेट एकेरी भाषेत अर्वाच्य शिवीगाळ करत धुरे यांच्यासह इतरांना दमदाटी सुरू केली. माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, तुला कोणाकडे तक्रार करायची ते कर, असा दम दिला.

यावेळी या ठिकाणी असलेल्या पोलीस सेवकांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गोसावी या ठिकाणावर निघून गेला झालेल्या प्रकाराची संदीप भुरे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन अंबड पोलीस ठाण्यात चेतन गोसावी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com