‘एम पासपोर्ट’ने पाडताळणी अधिक सुलभ; आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

0
नाशिक । पासपोर्ट पाडताळणी अधिक सुलभ व्हावी व यातील वेळ कमी करता यावा यासाठी पोलीसांसाठी ‘एम पासपोर्ट’ या नवीन अ‍ॅपचा प्रारंभ करण्यात आला असून यासाठीचे खास टॅब शहरातील 13 पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही प्रणाली सुरू करणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिजीटल इंडियाच्या वाटचालीतील शासकिय कामकाजाचा एक टप्पा म्हणून पोलिस आयुक्तालयात आज एम पासपोर्ट या पासपोर्ट पडताळणी कार्यप्रणालीचे उदघाटन पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. एम.पासपोर्ट हे अ‍ॅप असून शहरातील सर्व तेराही पोलिस ठाण्यांमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यापूर्वी पासपोर्ट काढू इच्छीणार्‍याला वेळोवेळी पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत मात्र या सुविधेमुळे अर्जदाराची धावपळ टळणार आहे. पोलिस कर्मचारी थेट अर्जदाराच्या घरी जावून छायाचित्रासह कागदपत्रे व इतर पडताळणी करणार आहेत. या कागदपत्रांची नोंद मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून डिजीटल स्वरूपात होणार असल्यामुळे प्रत्यक्ष कागदपत्रे बाळगणे आणि सांभाळणे यातून पोलिस आणि अर्जदाराची सुटका होणार आहे.

पुणे, ठाणे पोलिसांपाठोपाठ राज्यात नाशिकमध्ये प्रथमच हे अ‍ॅप उपलब्ध झाले असून पासपोर्टचे निरीक्षक भरत पराडकर यांनी या अ‍ॅपसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पोलिस आयुक्तालयात झालेल्या या मोबाईल अ‍ॅप उदघाटन प्रसंगी उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे यांच्यासह पासपोर्ट विषय कामकाज करणारे कर्मचारी उपस्थीत होते. उदघाटन समारंभानंतर सर्व संबधीतांना हे अ‍ॅप वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेत पोलिसांनी अर्जदाराच्या घरी जावून सर्व चौकशी करून पुढील प्रक्रिया करणे अपेक्षीत आहे. ही प्रक्रिया या अ‍ॅप मुळे सोपी होणार आहे.

LEAVE A REPLY

*