Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सलग तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन

Share

नाशिक । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात सलग तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील सुमारे 219 गुन्हेगारांची धरपकड केली. मतदानासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.21) मतदान होते आहे. त्यामुळे, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी (ता.19) रात्री 10 वाजेपासून पहाटे 2 वाजेपर्यंत शहर-परिसरात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली.

शनिवारी झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी 97 पैकी 58 सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. शहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापू नगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिमेची कारवाई केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार तपासणी, हॉटेल, लॉजेस तपासण्यात आले. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली. रेकॉर्डवरील 97 सराईत गुन्हेगारांचा शोध घेत 58 गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. हॉटेल्स-लॉजेस् व ढाब्याची तपासणी करीत 73 जणांविरुद्ध मुंबई पोलिस अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

546 वाहनांची तपासणी
नाकाबंदीमध्ये 546 वाहनांची तपासणी करण्यात येऊन 50 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत, 11 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे, शहरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत 84 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. तर नाकाबंदीदरम्यान, मद्यपान करून वाहन चालविणार्‍या 4 वाहनचालकांविरोधात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हनुसार कारवाई करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!