हैदराबादच्या अट्टल गुन्हेगाराला अटक; शहरात टोळी तयार करून करायचा चेनस्नॅचिंग, घरफोड्या

0
नाशिक । हैदराबाद येथे 54 गुन्हे दाखल असलेला, बेडीसह पलायन करून शहरात टोळी तयार करून चेनस्नॅचिंग, घरफोड्या करणार्‍या अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्याच्याकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महंमद मुजीब अफान बिन (25, रा. बंजारा इस्ट, जोहरानगर, हैदराबाद, सध्या रा. पंचशीलनगर, भद्रकाली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने केली. शहरात वाढलेल्या चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस हवालदार स्वप्नील जुंद्रे यांना हैदराबाद येथील एक गुन्हेगार स्थानिक चोरट्यांच्या साथीने चेनस्नॅचिंग करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहनिरीक्षक एन. एन. मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पोपट कारावाळ, जाकीर शेख, संजय पाठक यांच्या पथकाने घरफोडीच्या तयारीत असणार्‍या महंमद अफान बीन यास ताब्यता घेतले.

त्याची चौकशी केली असताना त्याने एका घरफोडीसह चेनस्नॅचिंग व इतर असे 11 गुन्हे केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने त्याला यामध्ये मदत करणार्‍या अक्रम अस्लम खान व अहमद शेख कादर शेख (30, दोघेही रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यांना अटक करण्यात आली आहे.

तर यातील दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्याकडून 16 तोळे सोने, दोन मोटारसायकली व रोकड असा 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे, अशोक नखाते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*