Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

पंतप्रधानांच्या सभेला तीन लाख चौरस फुटाचा मंडप, कृषिमाल नेण्यास प्रतिबंध ?

Share

चिंचखेड वार्ताहर : पिंपळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी तीन लाख चौरस फूट आकाराचा मंडप उभारण्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. तसेच मंडपात बसण्यासाठी एक लाख खुर्च्यांचे व्यवस्था करण्यात येत असून पिंपळगाव बसवंत येथील जोपुळ रोड वरील विस्तीर्ण पडीक शेतजमीनीवर कडेकोट पोलिस बंदोबस्तात मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधानांची पहिलीच सभा कृषिमाल उत्पदन्नाचे केंद्र पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीची सभा असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दक्षता बाळगली जात आहे. तसेच मंडप उभारण्याचे काम करणाऱ्या कामगारांना पोलीस यंत्रणेने विशेष पास दिलेले आहे. त्याव्यतिरिक्त पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या उपस्थितीत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान सभेच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांची तपासणी करून प्रवेश देण्यात येणार असून व्यासपीठ परिसरात पास असल्याशिवाय कोणालाही जाता येणार नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी पंतप्रधानांची सभा होणार आहे. त्याठिकाणी मंडप बांधण्याचे काम सुरू असताना अचानक नाग आणि साप निघू लागले. कोब्रा या जातीच्या नागाला सर्पमित्रांनी सभेच्या ठिकाणावरून पकडले. हा एक पडीक भाग असून त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात नाग, साप आहेत. त्यामुळे सभेपूर्वीच नाग सापांच्या बंदोबस्त बाबत प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. यासाठी व्यवस्था करण्यात आली असून सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले आहे.

ज्या भागात जाहीर सभा होत आहे तो परिसर शेतकरी आंदोलनाची भूमी असा ओळखला जातोय, कृषी मालाचे उत्पादन करणारा हा परिसर आहे. पाच वर्षात कृषी मालाला समाधानकारक भाव मिळाला नसल्याने शेतकरी वर्गाने अनेकदा आंदोलनातून अस्वस्थता व्यक्त केलेली आहे.

त्यामुळे प्रशासनाला आंदोलनाची धास्ती वाटत असून पंतप्रधानांसमोर कोणताही अनुचित आंदोलन किंवा प्रकार होऊ नये. त्यादृष्टीने प्रशासन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहे. परंतु जाहीर सभेत शेतीसंबंधी पंतप्रधान काय बोलतात याकडे समस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत. पंतप्रधानांच्या सभेत कांदा किंवा अन्य कृषिमाल नेण्यास प्रतिबंध घातला जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!