Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पेठ : आयुर्वेदिक तेलनिर्मितीतून उभारला ‘सोन्याचा संसार’

Share

नाशिक । गोकुळ पवार

चूल आणि मूल या चक्रातून आजची स्त्री बाहेर पडली आहे, असे नेहमी म्हटले जाते. पण स्त्रियांना घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. परंतु याला अपवाद ठरत पेठ तालुक्यातील भोयेपाडा या छोट्याशा गावातील जयवंतीबाई भोये यांनी निरगुडीचे तेलाचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवसाय करत असून या व्यवसायाद्वारे त्या संसाराचा गाडा चालवत आहेत.

पेठ तालुक्यातील भोयेपाडा येथे वास्तव्यास असणार्‍या जयवंतीबाई या महिलेने बचत गटाचा आधार घेत आपल्या कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी महिलांनी बचत गटाची स्थापना केली. माणदेशी संस्थेच्या माध्यमातून विविध औषधांचे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यामध्ये त्यांनी सहभाग घेत समाजाचा विचार करता निरगुडीच्या तेलाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. कारण ग्रामीण भागातील स्त्री व्यवसायाचा विचारच करू शकत नाही, असा एक समज आहे. परंतु या वाक्याला छेद देत त्यांनी व्यवसाय करण्याचे शिवधनुष्य उचलले आणि यातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्याच्या काळात आयुर्वेदिक, सेंद्रीय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे. साधारण दहा वर्षांपासून जयवंतीबाई निरगुडीच्या तेलाचे उत्पादन करतात. परंतु मागील दोन वर्षांपासून त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या ‘स्टार्ट अप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय भविष्यात विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वाताच्या विविध विकारांवर निरगुडीच्या तेलाचा उपयोग होतो. संधिवात, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, गुडघ्यांच्या हालचालीला त्रास होणे, हातापायाला सूज येणे, मुरगळणे यावर निरगुडीच्या पाल्यासह तेलाचा वापर केला जातो.

माणदेशी संस्थेच्या माध्यमातून मुंबई, पुणे, सातारा असा विविध ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून स्टॉल लावत आहेत. या ठिकाणी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत असून अनेक ठिकाणी कुरिअरच्या माध्यमातून तेलाची विक्री जयवंतीबाई करीत आहेत. यासाठी त्यांच्या सहकारी जयवंती भुसारे या मदत करीत असतात. आत्तापर्यंत सुमारे ४०० ते ५०० लिटर तेलाची विक्री झाली आहे. ‘रिपीट ऑर्डर्स’ येत असल्याने अधिक उत्पादन करावे लागत आहे. येत्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून विक्री करण्याचा मानस असल्याचे जयवंतीबाई यांनी सांगितले. तसेच अनेक पुरस्कारदेखील त्यांना मिळाले आहेत.

अशी होते तेलनिर्मिती
या पद्धतीत मुख्यत्वे निरगुडीचा पाला वापरला जातो. या पाल्याला चुलीवर उकळले जाते. त्यानंतर पूर्णतः गाळून घेतले जाते. तयार झालेला काढा पुन्हा एकदा उकळवून घेतला जातो. यानंतर त्यामध्ये तिळीचे तेल, गवती चहा, कापूर घालून पुढील दोन दिवस त्यास साठवून ठेवले जाते. या प्रक्रियेत कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही.

ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यांना उभारी घेण्यासाठी एक आधार हवा असतो. त्या कोणतेही काम करण्यासाठी तत्पर असतात. परंतु निवडक महिलांना अशा संधी मिळतात. शासनाने ग्रामीण महिलांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.
जयवंतीबाई भोये, महिला उद्योजक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!