Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी येथे १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू

Share

पंचवटी । वार्ताहर : पंचवटी दिंडोरीरोड तलाठी कॉलनी परिसरात एका इमारतीच्या गॅलरीतून पडल्याने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळावरील परिस्थिती बघता तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना वाटत असून आत्महत्या आहे कि घातपात या बाबत पोलीस शोध घेत आहे.

मंगळवार दि ४ रोजी पहाटेच्या सुमारास तलाठी कॉलनी परिसरात असणाऱ्या चैत्र चेतन या अपार्ट्मेंट मध्ये रहाणारी साक्षी सतिष अहिरराव (वय.१९) हि मुलगी इमारतीच्या आवारात जखमी अवस्थेत आढळून आली. पहाटे आलेल्या दुधवाल्याच्या नजरेस साक्षी आल्याने त्यांनी इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हि बाब सांगितली. त्याचवेळी साक्षीचे वडील सतिष हे तिला शोधत खाली आले आणि त्यांनी तिला जखमी अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले.

मात्र,तिची प्रकृती गंभीर असल्याने खासगी डॉक्टरांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. साक्षीला जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा दुपारी मृत्यू झाला. साक्षीच्या मृतदेहाचे शवचिच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक गायत्री जाधव, गुन्हे शोध पथकाचे संजय वानखेडे, संदीप शेळके, विष्णू जाधव, महेश साळुंके आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता या बाबत साशंकता व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्यासाठी सहज उडी मारता येईल असे ठिकाण सोडून दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर जाऊन उडी का मारली हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर साक्षीच्या केवळ डोक्याला जखम असून घटनास्थळी रक्ताचे प्रमाण कमी आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

साक्षी अहिरराव हिच्या आईचे दोनतीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे . घरात साक्षी तिचे वडील आणि हे तिघेच घरात रहातात. साक्षी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली असून सध्या ब्युटी पार्लरच्या क्लासला जात होती. वडील आणि भाऊ घरात झोपलेले असायचे तर साक्षी हि गॅलरीमध्ये झोपत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे .

चैत्र चेतन अपार्टमेंट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून त्याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये साक्षी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पडताना दिसत आहे. पहाटे साडेसहा वाजेपर्यत जवळपास चार तास तिथेच विव्हळत पडलेली होती. तिच्यासोबत तिचा मोबाईल फोन देखील असून जमिनीवर पडल्याने मोबाईलचे नुकसान झाल्याने तिचे कोणाशी बोलणे सुरु होते का याचाही तपास पोलीस करीत आहे . साक्षीला वेळीच उपचार भेटले असते तर कदाचित तिचे प्राण वाचले असते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!