पेमेट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी फिरवली पाठ

शाखा दोनशे अन् खातेधारक अवघे चार हजार

0

नाशिक । प्रतिनिधी
पोस्ट ऑफिसकडून मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या पेमेंट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे. नाशिक विभागात बँकेच्या दोनशे शाखा असून त्यामध्ये अवघ्या चार हजार ग्राहकांनी खाते उघडले आहेत. सद्यस्थितीत बँकेकडे वीस लाखांच्या ठेवी जमा आहेत. बँकेला ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. अद्याप बँकेने बाळसे धरले नसताना पोस्ट ऑफिसकडून मात्र, जिल्हयामध्ये बँकेच्या शंभरहून अधिक शाखा सुरू करण्याची लगीनघाई सुरू आहे.

पोस्ट ऑफिसला कॉर्पोरेट लूक देण्यासाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये पेमेंट पोस्ट बँक सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. गतवर्षी एक सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेमेंट पोस्ट बँकेचे उद्घाटन केले होते. नाशिकमध्येही जीपीओ येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पेमेंट पोस्ट बँकेची शाखा सुरू आहे. तसेच, विभागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी व निफाड या ठिकाणी देखील बँकेच्या शाखा सुरु आहेत. सध्यस्थितीत बँकेच्या दोनशे शाखा कार्यन्वित आहेत. मात्र, जिल्ह्यामध्ये बँकेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मागील सहा महिन्यात दोनशे शाखांंमध्ये अवघ्या चार हजार ग्राहकांनी खाते खोलले आहेत. सद्यस्थितीत बँकेकडे वीस लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. ही आकडेवारी बघता अद्यापही पेमेंट पोस्ट बँक ग्राहकांच्या पसंतीस उतरली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बँकेकडून खातेधारकांना ठेवीवर चार टक्के व्याज दिले जाते. इतर बँकाच्या तुलनेत हा व्याज दर अत्यल्प आहे. हे देखील पेमेंट पोस्ट बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरविण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच बँकेच्या एटीएम सुविधेला अद्याप मुहूर्त लाभला नाही. एकूणच अत्याधुनिक सोयी सुविधांच्या अभावामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात पेमेंट पोस्ट बँक अपयशी ठरत आहे.

शंभरहून अधिक नवीन शाखा होणार सुरू
नाशिक विभागात बँकेच्या दोनशे शाखा सुरू आहेत. आगामी काळात 124 नवीन शाखा सुरू केल्या जाणार आहेत. बॅकेमध्ये ग्राहकांना ऑनलाईन बँकिग, आरटीजीएस, एनएफटी, लाईट व मोबाईल बिल भरणा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आगामी काळात पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही योजना देखील सुरू केली जाणार आहे. तसेच, ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्था सुलभ व्हावी, यासाठी ग्राहकांना फक्त आधारकार्डवर पेमेंट पोस्ट बँकेत खाते खोलता येईल.

LEAVE A REPLY

*