Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा निर्यात अशक्य

Share

नाशिक : कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने व कमी आवक झाल्याने कांदा आयात करावा लागत आहे. कांद्याचे देशांतर्गत वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतातून अन्य देशांना कांद्याची निर्यात रोखण्यात आली आहे. निर्यातीवरील हे निर्बंध फेब्रुवारी 2020 पर्यंत कायम राहतीलअसा अंदाज आहे.

सरकारच्या निर्यात बंदी भूमिकेमुळे आशियात कांद्याचा दर अधिक राहील व नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे देशआपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्य देशांकडे जातील. भारत जगात कांदा निर्यात करणारा मोठा देश असूनही देशांतर्गत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये सरकारने काद्यांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.ऑक्टोबर व नोव्हेंबर या काळात पाऊस व पूर यामुळे कांद्याचा पुरवठा स्थानिक बाजारपेठेत मर्यादित राहिला व त्यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

कांदा उत्पादनात देशात अव्वल असणार्‍या महाराष्ट्रात पावसाच्या परिणामामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने बाजारातील दरवाढ बघायला मिळते आहे. एकदा कांदा सर्वसाधारण किमतीवर म्हणजे सुमारे 20 रुपये प्रति किलो या दरापेक्षा कमी किमतीवर स्थिरावला की निर्यातीची परवानगी मिळू शकते. ग्राहक कामकाज विभागाच्या विनंतीमुळे ही सरकारकडून निर्यात बंदी लादण्यात आली असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबरपर्यंत ही बंदी लागू राहील अशी सुरुवातीला अपेक्षा होती.

भारताने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले असल्याने आशियातील विविध देशांमध्ये कांद्याचे दर उसळले आहेत. त्यामुळे त्या देशांना इजिप्त, तुर्की, चीन येथून कांदा आयात करावा लागत आहे. मात्र, भारताकडून होणार्‍या कांद्याच्या निर्यातीची भरपाई त्यामुळे होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आशियातील खरेदीदारही भारताकडून कांद्याची निर्यात कधी सुरू होणार याकडे डोळे लावून आहेत.

कळवणला उच्चांकी 9100 रुपये भाव
सरकारने स्थानिक बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी खटाटोप केला असला तरी प्रत्यक्षात मात्र या प्रयत्नांना कुठेही यश आल्याचे दिसत नाही. मुळातच शेतकर्‍यांकडे टिकाऊ मानला जाणारा उन्हाळ किंवा गावठी कांदा मर्यादित स्वरूपात शिल्लक असून नुकताच बाजारात आलेला लाल कांदा देखील पावसाने खराब झाला आहे. या परिस्थितीत उन्हाळा कांदा गेल्या आठवड्यात दहा हजारांकडे झुकला आहे.

तर नवीन कांदा देखील 6-7 हजारांच्या दरम्यान स्थिरावला आहे. जिल्ह्यातील आज ( दि.25 ) च्या दरावर नजर टाकली , असता कळवणला उच्चांकी 9100 रुपये प्रतिक्विंटल इतकी नोंद झाली. पिंपळगावला शेतकर्‍यांचा उन्हाळ कांदा 8400 रुपये, लासलगावला 7600 रुपये, उमराणे 8 हजार रुपये, तर सटाणा बाजार समितीत 8295 रुपये कमाल दराने विकला गेला. म्हणजेच सरासरी 7500 रुपयांच्या आसपास दर राहिले. तर नाशिवंत मानल्या जाणार्‍या लाल कांद्याचे दर देखील 6 हजार रुपयांच्या आसपास स्थिर आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!