कांद्याला परदेशातून वाढती मागणी

0

कळवण । विनोद मालपुरे
कधी हसवणारा तर कधी रडवणारा कांदा पिकाचे अर्थकारण न समजण्यापलीकडचे आहे. देशात नाशिक जिल्हा हा द्राक्षा बरोबर कांदा पिकासाठी प्रसिद्ध असून येथील कांद्याला चांगली चव व टिकाऊ पणामुळे देशातून व परदेशातून मोठी मागणी आहे.

लासलगाव , देवळा, कळवण, वणी, उमराणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने कांदा विक्री उलाढाल मोठ्या प्रमाणत होते. सध्या कांद्याचे भाव तेजीत आले आहे.

परंतु वाढलेल्या भावाचा कांदा उत्पादक शेतकर्‍यास हवा तसा लाभ मिळत नसून कांदा साठा करून ठेवणार्‍या व्यापारी वर्गास व शेतकरी यांनाच त्याचा फायदा मिळतो आहे. कळवण तालुक्यात कांदा उत्पादान मोठ्या प्रमाणात होते. तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग आहे. पश्चिम भागात रब्बी हंगामांत कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते तर पूर्व भागात खरीप हंगामात कांदा लागवड जास्त होते. खरीप हंगाम हा जून ते ऑगस्ट दरम्यान असतो.

रब्बी हंगाम आक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो तर फेब्रुवारी ते मार्च दरम्यान उन्हाळी कांदा लागवड होते. तालुक्यात खरीप कांद्या पेक्षा रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. खरीपात 259 हेक्टर तर रब्बीत 4500 हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होते. कळवण तालुक्यात पंचगंगा, प्रशांत, प्रेरणा, गुलमोहोर या जातीच्या कांद्याची लागवड जास्त होते.

बियाणे टाकणे, रोपे तयार झाल्यावर लागवड करणे या कामास एकरी 20 हजार रुपये खर्च व बियाणे 15 हजार असे 35 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर खत – औषध फवारणी यास 15 हजार रुपये तर तणनाशक औषध 3 हजार रुपये खर्च येतो. निंदने, कांदा काढणी यास 10 हजारच्या आसपास मजुरी खर्च आहे तर चारमाही असणार्‍या ह्या पिकास पाणी देण्साठी साधरणता 5 हजार रुपये खर्च येतो.

एक एकरी कांदा पिकास 65 ते सत्तर हजार रुपये इतका खर्च येत असतो. या एक एकरात हवामान चांगले असल्यास योग्य निगा घेऊन 125 ते 140 क्विंटल कांदा उत्पादन होते. कांदा भाव हे नेहमी चढ उतार होत असतात. निर्यात शुल्क कमीजास्त झाल्यास बाजारभावात तेजी मंदी होते. अवकाळी पाऊस व निसर्गच्या लहरीपणामुळे उत्पादन घटल्यास भाव तेजीत येऊ शकतात यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकातून पैसे मिळवेल शाश्वती खोटीच आहे.

सहाशे ते सातशे ह्या भावात सरासरी कांदा विक्री होतो. ऑगस्ट ते नोव्हेंबर ह्या कालावधीत कांदा भाव तेजी मंदी मोठ्या प्रमाणात होत असते. नाशिक जिल्ह्यातून दुबई, अरब देश, श्रीलंका, मलेशिया, इंडोनिशिया आदी देशात कांदा निर्यात होतो व विशेष गरज पडल्यास पाकिस्तान येथून आयात होतो परंतु खासकरून निर्यातच जास्त होते.

कांदा पिक साठवणूक साठी शेतकरी कांदाचाळ बांधतो. साडेपाच फुट बाय 51 फुट चाळ बांधण्यास 2 लाख रुपये खर्च आहे. या चाळीत 200 क्विंटल कांदा साठवण्याची क्षमता असते. कांदा चाळ बांधण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदानही उपलब्ध करून देण्यात येते.

एप्रिल ते ऑक्टोंबर दरम्यान कांदा चाळीत साठवून हवा त्या प्रमाणात विक्रीस आणला जातो. कळवण कृषी उत्पन बाजार समिती कळवण मुख्य आवर व अभोणा, कनाशी उपबाजार आवार येथे एप्रिल महिन्यांपासून आजपर्यंत 6 लाख क्विंटल कांदा विक्रीस आला आहे. अजून 3 लाख क्विंटल कांदा विक्रीस येण्याची अपेक्षा आहे, कांदा पिकास शेकडा 1 टक्का इतकी मार्केट फी आकारण्यात येते. मार्केट फीच्या माध्यमातून कळवण बाजार समितीस चार महिन्यात 30 लाखाच्यावर उत्पन मिळाले आहे. दरवर्षी 12 लाख क्विंटल च्या पुढे कांदा विक्रीस येतो.

व्यापारी वर्गास फायदा
कांदा पिक घेणे हे खरोखरीच कठीण झाले असून कांदा लागवड करण्यास केलेला खर्च भरून निघणे सुद्धा काही वेळी शक्य होत नाही निसर्गाची अवकृपा आणि न मिळणारा बाजारभाव यामुळे कांदा उत्पादन करणे अवघड होऊन बसले आहे. कधीतरी वाढणार्‍या भावाचा फारच थोड्या शेतकर्‍यांना फायदा होतो बाकी व्यापारी वर्गास हमखास याचा लाभ मिळतो.
-संजय पाटील -कांदा उत्पादक पाळे खुर्द

LEAVE A REPLY

*