Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नंबरप्लेट नसलेली दीड लाखांवर वाहने ‘ऑनरोड’

Share

नाशिक । प्रतिनिधी
केंद्राच्या निर्णयामुळे 1 एप्रिल 2019 पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यात राज्यात साधारण चार लाख वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी यातील सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच नसल्याचे समोर आले आहे. काही वाहने विना नंबरप्लेट रस्त्यावरून धावत आहे, तर काहींनी कारवाईच्या भीतीने जुन्या नंबर प्लेटचा वापर सुरू केला आहे.

राज्यात महिन्याला साधारण दीड ते दोन लाख नव्या वाहनांची खरेदी होते. आरटीओकडून या वाहनांचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानुसार एप्रिल ते जून महिन्यात सुमारे चार लाखांवर वाहनांचे रजिस्ट्रेशन झाल्याचा अंदाज आहे. रजिस्ट्रेशनंतर नंबर प्लेटचा नंबर आरटीओ डीलरला उपलब्ध करून देतो. त्यानंतर हे नंबर मिळण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे.

मिळालेल्या या नंबरची यादी डीलरकडून संबंधित कंपनीला पाठविण्यासही पुन्हा एक-दोन दिवसांचा कालावधी जातो. कंपनी ‘एचएसआरपी’ तयार करणार्‍या सेवापुरवठादाराला ही यादी देते.

परंतु सेवापुरवठादाराकडून ‘एचएसआरपी’वर नंबर टाकण्यापासून ते तयार करायला व डीलरकडे यायला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नंबरप्लेट लावण्यासाठी डीलर वाहनचालकाला बोलावून घेत असला तरी वाहनचालक त्याच्या सवडीनुसार येतो. परिणामी, लाखो वाहने विना नंबरप्लेट रस्त्यावर धावत आहेत.

नियमाची पायमल्ली
एप्रिलपासून उत्पादित होणार्‍या सर्व नव्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक आहे. परंतु ही नंबर प्लेट मिळण्यास उशीर होत असल्याने अनेक वाहनचालक कारवाईच्या भीतीने जुन्या नंबर प्लेटवर आरटीओकडून मिळालेला नंबर टाकून रस्त्यावरून धावत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!