मोठ्या पोलिस बंदोबस्तात मल्हारखान परिसरातील अतिक्रमणे हटविली; पश्चिम विभागात आज मोहिम

0

नाशिक  । दि.१० प्रतिनिधी – अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण मोहिमेअंतर्गत आज सकाळी अशोकस्तंभ ते मल्हारखान परिसरातील पशुवैद्यकिय दवाखान्याच्या भिंतीला असलेली अतिक्रमणे महापालिकेने हटविली.

यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या अतिक्रमण मोहिमेसाठी केटीएचएम महाविद्यालयाकडून अशोकस्तंभाकडे जाणारा गंगापूर रस्त्याचा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सकाळच्या वेळेस या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. मात्र वाहनांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलिस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक कोंडी टळली.

दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्यालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्याही हटविण्यात आल्या आहेत. हा परिसर संवेदनशील असल्याने आणि समोरच पोलिस आयुक्तालय असल्याने याठिकाणी पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतल्याचे दिसत होते.

येथून जाणाऱ्या नाशिककरांनीही पोलिसांना सहकार्य करत मनपाच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी या मोहिमेचे स्वागत केल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानंतर मुंबईनाका परिसरातीलही धार्मिक स्थळेही मनपाने काढली. धार्मिक अतिक्रमणे काढण्याचा हा तिसरा दिवस आहे.

महानगरपालिका अतिक्रमण विभागाने काल (दि.9) सातपूर आणि पश्चिम विभागात अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत असलेली 21 अनधिकृत धार्मिक स्थळे काढली.

या कारवाईच्या दरम्यान नागरिकांच्या  किरकोळ विरोध लक्षात घेता मोहीम पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. त्यानंतर पश्चिम विभागातील शिल्लक असलेली अनाधिकृत धार्मिक स्थळे आज (दि.10) काढली जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या बुधवारी (दि.8) नवीन नाशिक विभागातून अनाधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई  महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरू केली होती.

त्यानंतर काल महापालिकेने ही मोहीम सातपूर विभागात सायंकाळपर्यत राबविली. यात 12 अनाधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली. सातपूर विभागात सकाळी 9 वाजता या कारवाईस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलो होता. महानगरपालिका प्रशासन आणि शहर पोलीस यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार ही कारवाई पुढे नेण्यात आली.

यात सातपूर विभागात एकूण 12 धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. याठिकाणी कारवाई करण्यापुर्वी महापालिका प्रशासनाने धार्मिक स्थळांतील मूर्ती काढण्यापूर्वी विधिवत पुजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळनंतर नाशिक पश्चिम विभागातील गंगापूर रोड व परिसरातील 9 अनाधिकृत धार्मिक स्थळे काढण्यात आली.

अशाप्रकारे आज 21 अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. बहुतांशी ठिकाणी जवळील नागरिकांनी स्वत:हून मंदिरातील मुर्ती काढुन घेतल्या. तर किरकोळ बाचाबाची वगळता ही कारवाई शांतेत पार पडली.

LEAVE A REPLY

*