निफाड : पोटाच्या खळगीसाठी, बांधून बिऱ्हाड पाठी.. तांडा चालला, तांडा चालला …
Share

पिंपळखुटे : दिवाळीचा सणोत्सव साजरा करून प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त दिसत आहे. कोणी शेतीत व्यस्त आहे, तर कोणी आपापल्या कामावर रुजु झाले आहेत. एव्हाना मुलांनीही शाळेची वाट धरली आहे. मजुरांना रोजच कष्ट उपसावे लागत असल्याने परिसरातील ऊस तोड कामगार आपली दिवाळी साजरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडावर रुजू होण्यासाठी लगबगीने निघाला आहे. सर्व संसार बैलगाडीवर ठेवून आपल्या काखेत लहानगं बाळ घेऊन हा तांडा मार्गस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या ग्रामीण भागात मजूर मिळाणेसे झाले आहे. या मजुरांचे आपणाला स्थलांतर होताना दिसत आहे. कारण यांना पोटाची खळगी भरण्यासाठी कालची पंचायत होती. ती त्यांनी उचल स्वरूपात घेऊन पूर्ण केलेली असते. त्यामुळे त्यांना आज जरी स्थानिक मजुरी उपलब्ध असली तरी कालची उचल फेडण्यासाठी आज मुकादम सांगेल त्या ठिकाणी, त्या कारखान्याकडे किंवा मुकादमाने ज्याप्रमाणात आपली अडचण पूर्ण केली असेल, त्याप्रमाणात कारखान्याकडे मजुरांचे तांडे स्थलांतरित होताना दिसत आहेत.
पोट भरण्यासाठी जाणचं आहे. कारण आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडताना आणि पोटाची खळगी भरताना अत्यंत कष्टाची असलेली ही वाट कितीही बिकट असली तरीही आनंदाने चालावी लागते. थंडीने ही गुलाबी गोडवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मजुराचे नातेगोते सोडून लहान मुले त्यांचा सांभाळ करणे, त्यांची शाळा, काही मंडळीचे मुला मुलींचे लग्न जमविणे, सगेसोयरे जाणे-येणे यासर्व परिस्थितीवर तेल सोडून हा कष्टकरी वर्ग आज केवळ हाऊस मजा मस्ती म्हणून नव्हे, तर पोटाची खळगी कशी भरेल व दोन वेळेच्या भाकरीची सोय तात्पुरती का होईना कशी होईल, याच आशेने आज कारखान्याची वाट चालतो आहे.
दररोज मजल दर मजल करीत कारखाना सांगेल त्या ठिकाणी ऊस तोडणी करण्यासाठी पोहोचायचे आहे. नोव्हेंबर ते एप्रिल- मे पर्यंत पुरेल तितके काम करायचे व शेवटी घराकडे परतायचे. हाच जणू कायम जीवनाचा पाढा असलेल्या ऊसतोड मजुरांना ही काही आशा-अपेक्षा या सरकारकडून निश्चितच असतील, परंतु त्या कितपत त्यांच्यापर्यंत पोहोचतात, की नाही हाही एक प्रश्न आहे; परंतु आज एकीकडे आयुष्य आरामात जीवन जगण्याचा परिस्थितीचा विचार करता त्यांनाही अजून किती पिढ्यांपर्यंत कष्ट करायला लागेल, हे येणारा काळच ठरवेल. कारण आज त्यांची घरदार सोडून आपल्या मुला-बाळांना काय संस्कार शिक्षण आधार मूल्य यांचा सर्वांगीण विकास कसा होणार, ही एक शोकांतिकाच आहे.
आज अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असलेला समाज व या गोष्टीत परिपूर्ण असलेला समाज यात मोठी दरी दिसून येते आहे. ती दरी भरून काढण्यासाठी आज तरी प्रयत्न गरजेचे आहे. नाहीतर आपणास अशा कितीतरी पिढ्या न् पिढ्या रस्त्याने जाणारी बैलजोडी, त्यावर एक सुखी संसारासाठी प्रयत्न करणारी सुंदर जोडी, त्यांच्या बैलगाडी बांधलेली लहानग्याची झोळी, हे चित्र पहावयास मिळेल, यात तीळमात्रही शंका नसल्याचे बोल ऐकू येत आहेत, हे मात्र नक्की.