Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : नांदूरमध्यमेश्वर होणार ‘रामसर’; महाराष्ट्रातील पहिलेच स्थळ

Share

कोठुरे। रणजित गुंजाळ
नांदूरमध्यमेश्वर येथील पाणथळ व दलदलीचा भूभाग जैविक वनस्पती व पशु-पक्ष्यांचा विचार करता पर्यावरण, वने आणि हवामान विभागाने नांदूरमध्यमेश्वरला ‘रामसर स्थळ’चा दर्जा प्राप्त होण्याचा प्रस्ताव रामसर सचिवालयाकडे पाठविला आहे. येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ दर्जा प्राप्त होणार आहे.

सन 1889 ते 1905 पर्यंत ब्रिटिशांनी नांदूरमध्यमेश्वर येथे गोदावरी, दारणा, कादवा संगमावर दगड, चुना व मातीचा वापर करुन सुमारे 1 कि. मी. लांबीचे धरण बांधले. धरण बांधकामानंतर दरवर्षी पुराच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ धरणात साठून धरणाची पाणीसाठवण क्षमता घटली. त्याचबरोबर नांदूरमध्यमेश्वर पासून सायखेड्यापर्यंतचा धरण परिसर पाणथळ व दलदलीचा बनला. याच दलदलीच्या भागात विविध जातीच्या पानवेली, झाडे, औषधी वनस्पती उगवल्या. भक्ष शोधणे पाणथळ जागेत सुलभ होवू लागल्याने येथे देशी-विदेशी पक्ष्यांचे प्रमाण वाढले.

1984 साली पक्षीमित्र सलीम अली व बॅरिस्टर गाडगीळ यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाला भेट देवून पाहणी केली. त्यांना येथे 250 प्रजातीचे पक्षी व तेवढ्याच विविध जातींच्या पानवेली व झाडे आढळली. याबाबतचा प्रस्ताव सादर करुन त्यांनी नांदूरमध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी शासन दरबारी केल्याने 1986 साली महाराष्ट्र शासनाने हा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला. येथे कुर्‍हाड बंदी व गलोल बंदी लागू केली.

आजच्या परिस्थितीत येथील पक्षी अभयारण्यात दरवर्षी हजारो देशी-विदेशी जातीचे पक्षी दाखल होतात. पक्षी निरीक्षणासाठी हिवाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. नांदूरमध्यमेश्वरच्या वैविध्यपूर्ण जैवविविधतेचे महत्व जाणून ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) व ‘बर्डलाईफ इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थांनी या ठिकाणाला ‘महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र’ (इम्पोर्टन्ट बर्ड एरिया) घोषित केले आहे. ‘सेन्ट्रल एशियन फ्लाय-वेफ या पक्षीस्थलांतराच्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये नांदूरमध्यमेश्वरचा समावेश होतो.

‘बीएनएचएस’ने 2008 मध्ये प्रकाशित केलेल्या पोटेंशिअल एक्झिस्टिंग रामसर साइट्स इन इंडिया या पुस्तकात नांदूरमध्यमेश्वरचे नाव नमूद केले आहे. त्यामुळे 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात या अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित केले होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होण्याकरिता आवश्यक असणार्‍या निकषांच्या कात्रीत अडकला;परंतु आता ‘केंद्रीय वन मंत्रालया’ने यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव ‘रामसर सचिवालया’कडे पाठवल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबत काही त्रुटी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. या त्रुटी नकाशासंबंधी होत्या. त्यांची पूर्तता करुन आम्ही प्रस्ताव पुन्हा पाठविल्याचे त्यांनी सांगितले. येत्या महिन्याभरात हा प्रस्ताव ‘रामसर सचिवालया’ कडून मान्य होणार असल्याची माहिती ‘केंद्रीय वन मंत्रालया’ तील अधिकार्‍यांनी दिल्याचे अंजनकर म्हणाले. भारतात 27 पाणथळ प्रदेशांना ‘रामसर स्थळ’ दर्जा मिळाला आहे.

‘रामसर’ म्हणजे काय?
इराणमधील ‘रामसर’ शहरात 1971 साली भरलेल्या ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते.याच परिषदेत जगातील महत्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चेव्दारा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. हा कृती आराखडानंतर 1975 सालामध्ये झालेल्या दुसर्‍या परिषदेत संमत करण्यात आला.

या कृती आराखड्यात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे, असे ठरले. अशा स्थळांचे त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे. तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आले. या आराखड्यात ‘पाणथळ जागेची’ व्याख्यासुद्धा करण्यात आली. पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा समावेश केला. समुद्री पाणथळीच्या जागांसाठी (खार्‍या पाण्याची सरोवरे, समुद्रकिनार्‍यावरील भरती-ओहोटीच्या जागा इ.) ओहोटीच्या वेळेस एकूण खोली 6 मीटरपेक्षा अधिक नसावी हा नियम करण्यात आला. भारताने 1982 मध्ये ‘रामसर’ करारावर सही केली होती.

‘रामसर’ मान्यता निकष
‘रामसर’परिषदेत ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी एकूण 9 जागतिक निकष मंजूर करण्यात आले आहेत. पहिला निकष नैसर्गिक किंवा अर्ध-नैसर्गिक दुर्मिळ प्रकारातील पाणथळ जागा असावी. उदाहरणार्थ बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असून त्यात खारे पाणी आढळते.

जगात अशी सरोवरे फार कमी आहेत. दुसरा निकष त्या ठिकाणी आढळणार्‍या संकटग्रस्त वन्यजीवांच्या प्रजातींच्या संवर्धनास असलेले महत्व अधोरेखित करतो. तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभौगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्व अधोरेखित करतो. चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळीचे महत्त्व (जसे स्थलांतरादरम्यान) विचारात घेतो. पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी आहे.

यामध्ये 20 हजार पाणपक्ष्यांचा आढळ वा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असणे जरुरी मानले गेले आहे. 7वा व 8वा निकष स्थानिक मत्स्यप्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व यावर आधारित आहे. शेवटच्या नवव्या निकषात पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का सदस्यांचा आढळ असणे जरुरीचे मानले गेले आहे.

महाराष्ट्रात प्रथमच दर्जा
नांदूरमध्यमेश्वरला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यास हे महाराष्ट्रातील पहिलेच ‘रामसर स्थळ’ ठरेल. ज्यामुळे या ठिकाणच्या संवर्धनाला बळकटी प्राप्त होईल. जागतिक मान्यता मिळाल्याने संवर्धनाचे विशेष प्रयत्न करण्यात येतील. ज्यामुळे तेथील जैवविविधता सुरक्षित राहील.
– सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!