Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सटाणा : अवघ्या २४ तासांत दोधेश्वर घाटातील खुनाचा उलगडा; अंधारातून मार्ग काढत महिलेने चालवली प्रियकराची पल्सर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

बागलाण तालुक्यासह संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासांतच सटाणा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी प्रेयसी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. रवि सुरेश खलाले (वय 36 रा.मंगल नगर, सटाणा) व त्याची प्रेयसी अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील प्रियकराला धुळे जिल्ह्यातून तर संशयित महिलेला सटाणा शहरातूनच ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरापासून दहा किती अंतरावर असलेल्या दोधेश्वर घाटात इंडिगो मांझा कारमध्ये एक मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. यानंतर हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले होते.

पोलिसांनी राजू सरदार याला आलेल्या फोन कॉलवरून एका दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या फोनवरून त्याला फोन झाल्याचे समोर आले. हा मुलगा त्याच्या मामाकडे नामपूर रोड येथे आल्याचे समोर आले. मुलाची चौकशी करून संशयित महिलेला ताब्यात घेतले. यानंतर संशयित खलाले यासही ताब्यात घेत अवघ्या काही तासांतच या खुनाचा उलगडा करण्यात सटाणा पोलिसांना यश आले.

अशी घडली घटना

दोधेश्वर घाटात राजू सरदार यांचा मृतदेह मिळून आल्यानंतर त्याचे बंधूने दिलेल्या फिर्यादीनुसार, सटाणा पोलिसांनी 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळावर अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी भेट देत पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली होती.

मयत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता. सायबर पोलिसांनी मोबाईल बंद होण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात कोण आले याचा सखोल अभ्यास करून शेवटी आलेल्या कॉलची तपासणी केली असता सटाणा शहरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हा फोन असल्याची खात्री सटाणा पोलिसांना झाली.

या अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या विद्यार्थ्यांच्या मामीने मोबाईल रात्री साडे दहा वाजल्यापासून ताब्यात घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती त्याने पोलिसांना देत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माझा मोबाईल घरी घेऊन आल्याची माहिती दिली त्यानंतर या महिलेला त्याब्यात घेतले.

गेल्या अडीच महिन्यांपासून मयत राजू सरदार हा या महिलेला सतत फोन करून त्रास देत असल्याची तक्रार प्रियकर रवी खलालेकडे केली. यानंतर या दोघांनी राजू सरदारचा खून करण्याचा कट रचला.

13 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या महिलेने राजू सरदार यांना फोन करून नामपुर रोडच्या बागलाण अकॅडमी जवळ बोलवले. राजू सरदार त्यांच्या इंडिगो मांझा कारने बागलाण अकॅडमी जवळ पोहोचले असता महिलेने कारमध्ये बसून दोधेश्वर-कोळीपाडा रोडने दोघेही निघाले. यानंतर रस्त्यातच महिलेचा प्रियकर असलेल्या खलाले हा रस्त्यात दबा धरून बसला होता.

सरदारला या महिलेने गाडी थांबवायला सांगितली. गाडीच्या बाहेर आलेल्या सरदाराच्या पाठीमागून पल्सर वर आलेल्या रवी खलालेने लोखंडी टॉमीच्या सहाय्याने सरदारच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर दोघांनी राजू सरदार यांना मृत अवस्थेत उचलून त्यांच्याच कारमधील मागील सीटवर त्यांचा मृतदेह ठेवला.

राजू सरदार यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकून आरोपी रवी खलाले यांने सरदार यांची कार चालवली. तर महिलेने पल्सर चालवुन दोधेश्वर घाट येथे पोहचले. दोधेश्वर घाटाच्या तीव्र उतारावर सरदार यांची कार न्यूट्रल करून कार अपघातात राजू सरदार यांचा मृत्यू झाला असे दाखवण्याचा प्रयत्न करत खलालेने कार उतारावर सोडून दिली. मात्र घाटातील वळणावरच्या नाल्यामध्ये कार अडकल्यामुळे हा अपघात नसून बनाव असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून दोघांना गजाआड केले.

पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांच्यासह योगेश गुंजाळ, अनुप्रीती पाटील, जिभाऊ पवार,नवनाथ पवार, अजय महाजन, सागर चौधरी, विजय वाघ यांनी या खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!