Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. परिणामी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 80 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तर दारणा धरण 87 टक्के भरले आहे. खबदारीचा उपाय म्हणून सोमवारी दारणातून 13 हजार तर गंगापूर धरणातून सायंकाळी पाच वाजेपासून साडेपाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाची संततधार बघता विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर दीड ते दोन तासांत पाण्याचा प्रभाव रामकुंडावर दिसून आला. गोदावरीच्या पुराचे परिमाण मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचल्याने मोठ्या संख्येने नाशिककरांनी नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

गोदावरी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातून हंगामातील पहिला वहिला विसर्ग आज गोदावरी नदीत केला जात आहे. सायंकाळी ५ हजार ४९९  क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून पावसाची तीव्रता अशीच सुरु राहिल्यास विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

मागील एक आठवड्यापासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातही वरुणराजाने कृपा केली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे येथील धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्र्यंबकमध्ये मागील तीन दिवसांत चारशे मिलीमीटर इतका पाऊस कोसळला. नाशिक शहराची तहान भागवणार्‍या गंगापूर धरणाचा जलसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग केला जात आहे. सोमवारी धरणातून एक हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर काही वेळानेच विसर्ग वाढवून साडेपाच हजारपर्यंत नेण्यात आला. यामुळे गोदाकाठावरील रहिवासी, दुकाने, व्यावसायिक यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात धरणातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दारणा धरणातूनदेखील विसर्ग सुरू आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास विसर्गात वाढ होऊ शकते.

आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क

धरणातून विसर्ग केला जाणार असल्याने नदीपात्राची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे चांदोरी, सायखेडा ही गावे पाण्यात जाण्याची भीती आहे. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क आहे. नदीकाठच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवर विभाग लक्ष ठेवून असून मदतीसाठी हेल्पलाईनदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!