Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : गाढवावरून जावयाची धिंड काढून साजरा होतो वडांगळीतील ‘रंगोत्सव’

Share

संग्रहित फोटो

अजित देसाई l सिन्नर

ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवणूक काढली जाते त्याच गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची जगावेगळी प्रथा सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून पाळली जात आहे.

धुलीवंदन ते रंगपंचमी दरम्यानच्या कालावधीत जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याची निश्चित माहिती नसली तरी इंग्रजी राजवटीत एका इंग्रज मामलेदाराची देखील वडांगळीच्या ग्रामस्थांनी गोड बोलून गाढवावरून धिंड काढल्याची आठवण जुने जाणते सांगतात.

रंगपंचमीला सर्वच ठिकाणी रंगोत्सवाला उधान आलेले असतांना वडांगळीकर मात्र धुलिवंदनापासुनच जावई शोध घेण्यात व्यस्त असतात. धुलीवंदन ते रंगपंचमी या कालावधीत गावातील घर जावई, गाव जावई अथवा गावकरी ज्यांना जावयाच्या नात्याने वागवतात अशा व्यक्तींचा या जगावेगळ्या धिंडीसाठी प्राधान्याने विचार केला जातो.

नोकरी-व्यवसायानिमित्त गावात बाहेरून येऊन स्थायिक झालेले व्यापारी, नोकरदार व्यक्तींशी गावकऱ्यांकडून जावयाचे नाते लावले जाते. त्यांच्या बायकांना मुलीचा दर्जा दिला जातो. त्यांच्याशी गावातील तरुण मंडळींचे चेष्टेचे नाते निर्माण होते. दाजी दाजी म्हणत बहिणीच्या या नवऱ्याचा वर्षभर मान राखायचा. मात्र, शिमग्याला वर्षभराचे उट्टे काढत त्याची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा मजेदार म्हणावी लागेल.

जावयाला धिंडीसाठी राजी करणे हे मोठे दिव्य असते. कोणीही जावई राजीखुशीने स्वतःची धिंड काढून घ्यायला तयार होत नसतात. मग गावातील तरुण मंडळींकडून जावयावर साम-दाम-दंड-भेद, इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी सर्व आयुधे वापरली जातात. त्यासाठी गुप्त मसलती, खलबते केली जातात.

अनेक जावई होळी रंगपंचमीच्या काळात गावाकडे चुकून देखील फिरकत नाहीत. किंवा गावात राहणारे गावाबाहेर निघुन जातात. पण प्रत्येकवेळी एखादा का होईना खिलाडू वृत्तीचा जावई सापडतोच.

ग्रामस्थांच्या दृष्टीनेही असा जावई म्हणजे टप्प्यातील सावध असते. किरकोळ आढेवेढे घेत प्रसंगी चांगला पाहुणचार पदरात पाडून हा जावई गाढवा बसायला तयार होतो. जावयाची मनधरणी करणाऱ्या व्यक्तीकडेच बहुतेक वेळा प्रथेचे यजमानपद येते.

मग धिंडीसाठी लागणारा खर्च, त्यानंतर जावयाला करावयाच्या पंचवस्त्र पोशाख याचा खर्च करावा करावा लागतो. मनधरणी मिनतवाऱ्या करून तयार झालेला जावई गाढवावर बसवला जातो. त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात. गळ्यात कांद्याचा, फाटक्या चपलांचा हार घातला जातो. कधी फाटक्या टायरचे देखील हार असतात. डोक्याला मोत्यांऐवजी लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्या सुपाचे बाशिंग बांधले जाते.

मग यजमानाच्या घरापासून ही मिरवणूक सुरू होते. होळीतील राख, रंग, चिखलमाती याची मनसोक्त उधळण करत गावातील प्रत्येक गल्लीतून हा जावई गाढवावरून मिरवला जातो. सासरेबुवांची कुंडलीतील दशम ग्रह समजल्या जाणाऱ्या जावयाची धिंड म्हटल्यावर मिरवणुकीत चांगलाच जोश संचारतो.

बोंबला रे बोंबला म्हणत जावयाच्या विविधांगी गुणांचे (अवगुणांचे देखील) वर्णन करत बोंबा मारल्या जातात. अनेक घरांपुढे खास थांबवून कांद्याच्या फुलांच्या माळा जावईबापूंच्या सगळ्यात अडकवल्या जातात. जावयाची गाढवावरून धिंड निघाली की गावच्या दुष्काळाचे सावट दूर होते.

पाणी पाऊस चांगला होतो. रोगराई नाहीशी होते. गावाची भरभराट होते अशी गावकर्‍यांची धारणा आहे. त्यामुळे जावयाला गावाच्या भल्यासाठी गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. रंगपंचमीच्या या प्रथेमुळे जावयाच्या अंगी असलेला ताठा, अहंकार गळून पडतो असे मानले जाते. तसेच ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनण्याची ही मोठीच संधी या निमित्ताने गावाच्या जावयांना मिळते.


प्रथेचा उल्लेख ‘गाढवावरून धिंड’ असा केला जात असला तरी या धिंडीसाठी गाढवीण वापरली जाते. या गाढवीणीला धिंडीत नवरी संबोधले जाते. ( नशीब तिच्यासोबत जावयाचे लग्न मात्र लावले जात नाही ). करवले म्हणून गावातील सर्व तरूण या वेळी हजर असतात. सोबतीला शिमग्याच्या बोंबांची मंगलाष्टके असतातच.

असा जोरदार शिमगा करून धिंड यजमानाच्या दाराशी संपते. त्यानंतर गल्लीतील चार घरच्या सुवासिनी एकत्र येऊन जावयाला सुगंधी उटणे लावून अंघोळ घालतात. यजमानाकडून जावयाला पंचवस्रे देण्यात येतात. गावाच्या प्रथेचा मान राखल्याबद्दल यजमान व ग्रामस्थ जावयाचे आभार मानतात. त्यानंतर जावई नवीन वस्त्रे परिधान करून ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारत गावातील प्रमुख मार्गावरून फेरी मारतो.


बंजारा समाज बांधवांचे आराध्यदैवत असणाऱ्या सतीमाता व सामत दादा यांचे वास्तव्य वडांगळी या गावी आहे. नवसपूर्तीसाठी देण्यात येणाऱ्या बोकड बळीसाठी सतीमाता यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. याच गावात जावयाची धिंड काढण्याची परंपरा गेल्या शतकापासून जोपासली जात आहे.

यंदा देखील धुलीवंदना पासून गावातील तरुणांचे विविध गट जावयाचा शोध घेत असून रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच हा शोध संपला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उद्याच्या रंगपंचमीला जावयाच्या धिंडीची परंपरा खंडित न होता रंगोत्सवाचा आनंद गावातील तरुणाई घेणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!