Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वावी ते पंचाळे दरम्यान रस्त्यालगत फुलणार वनराई; सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून  5 हजार झाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य 

Share
सिन्नर | अजित देसाई 
राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वावी ते हिवरगाव दरम्यानच्या ओझर शिर्डी राज्य महामार्गालगत दहा किलोमीटर अंतराच्या क्षेत्रात 5 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारी देशी प्रजातींची विविध झाडे या उपक्रमात लावली जाणार असून पुढील तीन वर्षे या झाडांची जोपासना सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे
झाडे लावा – झाडे जगवा या घोषणेच्या पलीकडे सद्यस्थितीत वृक्षसंवर्धनाची कोणतीही मोहीम दृश्य स्वरूपात यशस्वी झाल्याचे दिसत नाही. गेल्या पाच वर्षांपासून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून दि. 1 जुलै ते दि.30 सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सवाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात वृक्ष लागवड अभियान राबवले जाते.
या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांसह, शैक्षणिक संस्था व इतर शासकीय आस्थापनांना सहभागी करून त्‍यांना ठराविक संख्येने वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून दिली जातात. मात्र केवळ फोटोसेशन पुरतेच झाडे लावण्याचे काम होते आणि पुढील वर्षी त्याच खड्ड्यात नवीन झाड लावून नवीन खड्डा घेतला जातो. मात्र याला अपवाद ठरवण्यासाठी सिन्नर येथील सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली असून वृक्षलागवड अभियानात लागवड करण्यात आलेल्या झाडांची जोपासना चांगल्या पद्धतीने होईल यासाठी नियोजन केले आहे.
तालुक्यात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे रस्ते आहेत. हे रस्ते बनवताना संबंधित ठेकेदाराला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देऊन त्याची जोपासना करण्यासाठी शासनस्तरावरून जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र , ठेकेदारांकडून लावलेली किती झाडे कोणत्या रस्त्यावर उभी राहिली हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
गेल्या पंचवार्षिक काळात आघाडी सरकारच्या माध्यमातून ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. राज्य महामार्ग दर्जाचा हा रस्ता सिन्नर तालुक्यात हिवरगाव येथून सुरू होतो व सायाळेच्या जिल्हा सरहद्दीवर संपतो. मात्र या संपूर्ण मार्गात कुठेही झाडे लावून त्यांची जोपासना केल्याचे उदाहरण नाही.
यंदाच्या वृक्षलागवड अभियानात सामाजिक वनीकरण विभागाच्या सिन्नर कार्यालयाकडून मात्र वावी ते पंचाळे दरम्यानच्या दहा किलोमीटर अंतरात या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या शनिवारी दि. 6 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वावी येथून या अभियानास प्रारंभ करण्यात आला. दि. 1 जुलै ते ही 30 सप्टेंबर या कालावधीत या मार्गाच्या लगत निर्धारित केलेली पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे या झाडांची जोपासना करण्यात येणार असून पावसाळ्याचा काळ वगळता त्यांना पाणी घालण्यासह त्यांच्या राखणाच्या कामासाठी स्थानिक मजुरांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून एका राज्य महामार्गाच्या लगत झाडे लावण्यासाठीचा घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. या वृक्ष लागवडीसाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून तयारी सुरू होती.
तत्कालीन लागवड अधिकारी तथा वनक्षेत्रपाल वलवे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी ते हिवरगाव दरम्यान वृक्ष लागवड करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, या मार्गात असणारी शेतकऱ्यांची अतिक्रमणे, काही ठिकाणी झाडे लावताना व ती सांभाळतांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या टप्प्यात वावी पासून पंचाळे पर्यंतचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा सावली देणाऱ्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करण्यात येणार आहे. या वड पिंपळ कडुलिंब शिशु करंज खैर या प्रजातीच्या झाडांचा मुख्यत्वेकरून समावेश करण्यात आला आहे.
वावी येथे सरपंच नंदा गावडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करून या अभियानास प्रारंभ करण्यात आला उपसरपंच विजय काटे, सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी तथा वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे वनरक्षक, दर्शना चौपुरे ग्रामपंचायत सदस्य सतीश भुतडा, कांता कांदळकर, ग्राम विकास संघाचे अध्यक्ष विलास पठाडे, रमेश गावडे, चंद्रकांत पठाडे, अरुण ताजणे, संदीप राजेभोसले, केदार सोमाणी, नवनाथ घेगडमल, लक्ष्मण नवले,  संदीप सरवार आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
वावी ते हिवरगाव दरम्यान ओझर शिर्डी राज्यमहामार्गावर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्यात पंचाळे पर्यंत 5 हजार झाडे लावली जाणार आहेत. या लागवडीसाठी फेब्रुवारी – मार्च या कालावधीत खड्डे खोदण्यात आले तर मे महिन्यात त्यांची बुजवणी करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे परिस्थिती लागवड योग्य बनली आहे. दि.30 सप्टेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल (सामाजिक वनीकरण) सुभाष सांगळे, वनरक्षक दर्शना चौमुले यांनी दिली. झाडांची निगा राखण्यासाठी पुढील तीन वर्षाच्या काळात स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!