Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महात्मा गांधी रस्त्यावर वाहतूक कोंडी; एकही पोलीस कर्मचारी नाही, वाहनचालकांत हमरीतुमरी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील स्मार्टरोडच्या कामासाठी मुख्य मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वर्दळीच्या महात्मा गांधी (एमजी) रोडवर नेहमीच वाहतूक कोंडीत अनेक वाहने सापडत असतात. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडीचा फटका चाकरमान्यांना तर बसलाच शिवाय स्कूल वाहनेदेखील या कोंडीत सापडल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत उशिराने पोहोचावे लागले.

एमजी रोड मार्गे कुणाला एकेरी मार्गाने अशोक स्तंभाकडे जावयाचे होते, तर कुणाला गोळे कॉलनी गाठायची होती. यामुळे बंद असलेल्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दाखल न झाल्याने वाहनधारकांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

महात्मा गांधी रस्त्यावर वाहतूक कोंडी

महात्मा गांधी रोडवर वाहतूकीचे तीन तेरा; एकही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर नाही, वाहनचालकांत हमरीतुमरी

Deshdoot यांनी वर पोस्ट केले गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

येथून जवळच असलेल्या रेड क्रॉस सिग्नलवर ३-४ चार वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. मात्र, अवघ्या १०० ते १५० मीटरवर वाहतूक कोंडी निर्माण झाली असताना एकही कर्मचारी याठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी धावून न आल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मेहेर सिग्नलचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे गणेश विसर्जनादरम्यान सुरु असलेली दुहेरी वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. याचा फटका वाहनधारकांना बसला. ‘पुढे प्रवेश बंद’ असल्याचा फलक महात्मा गांधी रस्त्यावरील कॉंग्रेस भवनच्या समोर लावण्यात आल्यामुळे रेड क्रॉस सिग्नलकडून मेहेरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना पूर्वसूचना मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वाहने अशोक स्तंभाकडे एकेरी मार्गाला वळवावी लागतात. तर अनेकांना यु-टर्न घेऊन पुन्हा रेड क्रॉस सिग्नल गाठावे लागते.

तसेच अशोक स्तंभ परिसरातून पंचवटी हॉटेल मार्गे एमजीरोड गाठणाऱ्या वाहनांचीदेखील याठिकाणी एन्ट्री होत असल्यामुळे एकेरी मार्ग असूनही दुहेरी वाहतूक या रस्त्यावर सुरु आहे. रस्ता बंद केल्यामुळे ही वाहतूक वाहतूक शाखेने शिथिल केली असल्याचे बोलले जात असले तरी याठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजूने येणारी वाहने याठिकाणी फसतात. परिणामी, वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते.

नेहमीच होणारी वाहतूक कोंडी फुटावी यासाठी पोलीस यंत्रणेने वाहतुकीचे योग्य नियोजन केले पाहिजे. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले पाहिजेत. तसेच याठिकाणी पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त केले पाहिजेत अशीही मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!