Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आज नाशिक-दिल्ली विमानसेवा ‘हाऊसफुल्ल’; १४५ तिकिटे बुक

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी  

जेट एअरवेजने सुरू केलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळात आहे. आज नाशिकहून 140 सर्वसाधारण गटातील तर 5 बिझनेस क्लास अशा 145 प्रवाशांनी नाशिकहून दिल्लीकडे झेप घेतली.
विमानाच्या आसन संख्येबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा रंगलेली होती. 168 आसन असलेल्या विमानात आज इकॉनॉमी क्लासचे एक तिकीट अतिरिक्त बुक झाले असल्याची चर्चा होती. आता त्या प्रवाशांचे काय, यावर ‘जाणकार’ सोशल मीडियावरून तर्क-वितर्क लढवताना दिसत होते. याबाबत निमाच्या विमानसेवा उपसमितीचे समन्वयक मनीष रावल यांनी या विमानाची क्षमता 168 आसनांचीच असल्याचे सांगितले व प्रत्यक्षात 145 प्रवाशी गेल्याचे सांगितले. एक अतिरिक्त प्रवासी बुक झाल्याच्या चर्चेवर पडदा पडला.

नाशिक-दिल्ली जेट एअरवेजच्या विमानसेवेला आज आठ महिने होत आले आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेअंतर्गत काही आसनांना सवलतीचे दर ठेवण्यात आले होते, मात्र दिवसेंदिवस प्रवाशांचा प्रतिसाद या विमानसेवेला मिळत असून अतिरिक्त दरानेही प्रवासी दिल्ली गाठताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे मागील आठ महिन्यांत एकदाही ही सेवा खंडित झाली नसल्याचे समाधान उद्योजकांनी व्यक्त केले. आठवड्यातून तीन दिवस मिळणारी सेवा आता दररोज मिळावी, अशी मागणी होत आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस नाशिक-दिल्ली व दिल्ली ते नाशिक 168 आसन क्षमता असलेले विमान उड्डाण करते.
गेल्या आठ महिन्यांपासून या विमानसेवेचा फायदा केवळ प्रवासीच नव्हे तर कार्गो सेवेनेही घेतला आहे. नाशिकचा भाजीपाला, गुलाबाची फुले, इतर ताजा शेतमाल अवघ्या पावणेदोन तासाच्या अंतरात राजधानी दिल्लीत पोहोचू लागला आहे. त्यामुळे कार्गोच्या वाहतुकीतूनही जेट एअरवेजला दुहेरी फायदा झाला आहे.

पायाभूत सुविधांची वानवा
हजारो किलोमीटरचा प्रवास करून नाशिकला येणार्‍या विमानातील प्रवाशांना मात्र ओझर विमानतळ ते शहरादरम्यानचा प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. विमानतळ उभे राहिल्यानंतर हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र विमानसेवा रखडत रखडत आता सुरळीत झाली तरी या सुविधांबाबत उदासीनताच दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिशय दिव्यातून टॅक्सीसेवा सुरू झाली असली तरी त्यात आणखी सुधारणा होणे अपेक्षित असल्याची चर्चा आहे.

नाशिकच्या सेवेला बुस्ट
नाशिकहून दिल्लीची विमानसेवा ’फुल्ल’ सुरू असतानाच आता नाशिकहून अहमदाबाद व हैदराबाद अशा दोन विमानसेवांनादेखील प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. नाशिक हैदराबादसाठी 72 आसनी विमानात आज 58 प्रवाशांनी जाण्याचा तर 51 प्रवाशांनी येण्याचा लाभ घेतला. काहीशा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र नाशिक- अहमदाबादसाठीदेखील आहे.

आणखी चार शहरांना जोडणार
येत्या 13 फेब्रुवारीला जेट विमानसेवेद्वारे बुधवार ते शनिवारदरम्यान अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ इंडिगोच्या माध्यमातून 1 एप्रिलपासून नाशिक-भोपाळ, बंगळुरू व मिलिटरी कॅम्प असलेल्या हिंदन या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तर स्पाईसजेटद्वारे नाशिक- गोवा सेवा सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!