‘सुविचार गौरव’चे उद्या वितरण; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अभिनेते स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर यांची उपस्थिती

0

नाशिक दि. १२ (प्रतिनिधी) : सुविचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.   

समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंची निवड केली आहे.

यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ. रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु (वैद्यकीय), विश्वास ठाकूर (सामाजिक), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.

उद्या सोमवार (दि. १३) सांयकाळी ५ वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार सोहळ्यात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*