Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

चार पावलांची माघार अन् वाघाचीच शिकार!

Share

नाशिक | हेमंत अलोने 

सिंह त्याच्या सावजावर हल्ला करण्यापुर्वी चार पावलं मागे जातो, सावजाच्या हालचाली टिपतो आणि ऐन मोक्याच्या वेळी त्याचा फडशा पाडतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या भुकंपात भाजपाची भूमिका त्या सिंहासारखीच राहिली आहे.

मुळात आक्रमक असलेल्या भाजपाची गेल्या आठ-दहा दिवसातील मागे जात शांत, संयमी भूमिका हिच मुळात त्यांचा अ‍ॅक्शन प्लान असल्याचे आज समोर आले आहे.

राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात भाजपाची आक्रमक अशी ओळख 2014 नंतर तयार झाली. मोदी-शहा या जोडगोळीने अनेक धक्कातंत्राचा वापर करीत सारा देश पादाक्रांत करण्याचा विडाच उचलला.

काँग्रेस सकट सार्‍याच विरोधकांना गारद करीत मोदी-शहांनी भाजपाला नव्या उंचीवर नेले. अनेक राज्य काबीज करुन विरोधकांना नामोहरम केले. कर्नाटक, गोव्यात भाजपाच्या तोडाफोडीच्या राजकारणाचा प्रत्ययही आला होता. महाराष्ट्रासारखी आर्थिक राजधानी गमावणे भाजपाला परवडणारे नव्हते त्यामुळेच महाराष्ट्र पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली होती. शिवसेनेची गेल्या पाच वर्षातील भूमिका सत्तेत राहून विरोधकांचीच होती.

त्यामुळे एकीकडे शिवसेनेला सोबत घेत दुसरीकडे पाडापाडीचे राजकारण खेळत स्वबळावर सत्तेचे मनसुबे भाजपाने रचले होते. दुदैवाने निवडणुकीचा कौल भाजपाच्या बाजूने गेला नाही. सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेला सोबत घेण्याशिवाय भाजपापुढे पर्याय उरला नाही. याचवेळी शिवसेनेची सत्ताकांक्षा उफाळून आली आणि त्यांनी अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा धोशा लावून धरला.

भाजपाने शिवसेनेची ही मागणी धुडकावून लावताच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी जवळीक साधली. ही सोबत करतांनाच शिवसेनेच्या संजय राऊतांनी दररोज भाजपाला घायाळ करण्याची एकही संधी सोडली नाही. सुरवातीला शिवसेनेला झुलवत ठेवणार्‍या राष्ट्रवादीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मात्र शिवसेनेबाबत अनुकूल भूमिका घेतली. स्वत: शरद पवारांनीच शिवसेनेची वकीली करत काँग्रेसची रजामंदीही मिळवली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेस हे तिन्ही पक्ष भाजपावर तुटून पडत असतांना भाजपाकडून मात्र पलटवार होत नव्हता. शिवसेना युतीत लढली असल्याने त्यांनी चर्चेतून मार्ग काढावा असा शहाजोग सल्लाच भाजपा देत राहिली. निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन चा आक्रमक जप चालवला होता.

स्वत: मोदी, शह्रांनी देखील जाहीरपणे फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असे घोषित केले होते. प्रचारातील भाजपाची ही आक्रमकता निकालानंतर मात्र कमालीच्या संयमात बदलली होती. राष्ट्रीय पातळीवरील बलाढ्य भाजपा अशी भूमिका का घेत आहे, हे कोडे राजकीय निरिक्षकांना पडले होते. मात्र या भयाण शांततेतच भाजपाचे डावपेच सुरु होते.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रसचे सूत जुळत असतांना मख्खपणे पाहतेय अशी वाटणारी भाजपा आतल्याआत एका भूकंपाची तयारी करीत होती. शहा यांना भाजपाचे आधुनिक चाणक्य म्हटले जाते. त्यांनी भाजपासाठी अवघड गणिते जुळवून आणली आहेत, असे असतांना शहा यांचे मौन हे वादळापुर्वीची शांतताच होती.

भाजपा तोडाफोडीचे राजकारण करणार नाही असे निक्षूण सांगतांनाच प्रत्यक्षात पावले त्या दिशेनेच पडत होती. आघाडी आणि शिवसेनेच्या दररोज पत्रकार परिषदा होत असतांना भाजपाकडून मात्र कोणतीच भूमिका येत नव्हती. राज्याच्या सत्ताकारणातून भाजपाने माघार घेतल्याचे चित्र पध्दतशिरपणे गेल्या आठवड्यापासून रंगविण्यात आले. सारे माध्यमजगत, राजकीय धुरिणांचे लक्ष महाशिवआघाडीच्या जन्माकडे लागले असतांनाच भाजपाने मोठी खेळी खेळत रातोरात सत्ता स्थापनेचा दावा ठोकत प्रभात समयीच सत्तारोहणही करुन टाकले.

आधुनिक भाजपाची एकूणच कार्यपध्दती आक्रमक असली तरी महाराष्ट्रात मात्र त्यांनी सावध खेळी केली. एकीकडे महाशिवआघाडीचे स्वयंवर रचले जात असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीलाच भगदाड पाडले. भाजपाने आज केले ते पंधरवड्यापुर्वीही सहज शक्य होते. मात्र वातावरण तापवत नेत हळूच त्यांनी शिवसेनेच्या फुग्यातील हवा काढून टाकली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर होवू दिले आणि हा भूकंप घडवून आणला.

यातून मातोश्री पदासाठी तत्वाला तिलांजली देत असल्याचे भाजपाने अधोरेखित करुन टाकले. 99 साली शरद पवारांनी काँग्रेस फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. आता त्यांच्याच पुतण्याने राष्ट्रवादी फोडली आहे, हा नियतीचा खेळच म्हणावा. असंगांशी संग केल्याने काय होते ते काँग्रेस आज अनुभवत असेल.

राष्ट्रवादी यातून पुन्हा उभी राहीलही मात्र शिवसेनेला जबर फटका बसणार आहे. आपल्या आमदारांना एकसंघ ठेवण्याचे कठोर आव्हान आता उध्दव ठाकरेंसमोर असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!