Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

Share

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी.

त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने हाका मारीत असे. त्यांच्या लहानपणीच्या छोटया मोठया प्रसंगातून आईने त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम केले आहे. याच विचारातून त्यांच्या हातून श्यामची आई नावाचे प्रसिद्ध साहित्य निर्मिले गेले. ज्यातून श्याम म्हणजे साने गुरुजी कसे घडले? याची प्रचिती येते.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला त्यांच्या काकांकडे राहू लागले, परंतु तेथील वातावरण व परिसर त्यास रुचले नाही आणि ते परत आपल्या गावी आले. गावापासून जवळपास 6 मैल अंतरावर असलेल्या मिशनरी शाळेत प्रवेश घेतला.

रोज पायी चालत ते शाळेला जात असे. मराठी व संस्कृत विषयात आपण प्रज्ञावान आहोत याची सर्वप्रथम जाणीव याच शाळेत झाली आणि तेथेच त्यांना कविता करण्याचेही सुचू लागले. साने गुरुजींच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. गुरुजींच्या शिक्षणाविषयी घरात चर्चा होऊ लागली. वडील भाऊ सुद्धा साने गुरुजींच्या शिक्षणाविषयी चिंतेत होते. ही बाब साने गुरुजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी औंध इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला.

कारण येथे गरीब मुलांसाठी मोफत शिक्षणासोबत मोफत जेवण सुद्धा दिल्या जात असे. कठीण परिश्रम करीत ते आपल्या शिक्षणाचा प्रवास करीत होते. तेथून ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला . सन 1918 मध्ये गुरुजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्याच्या एका वर्षापूर्वी त्यांची लाडकी आई यशोदाबाई यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना डोक्यावर आभाळ कोसळल्यागत वाटले. कारण त्यांच्यासाठी आई ही सर्वस्व होती. ती प्रेमस्वरूप होती, वात्सल्यसिंधु होती. महाविद्यालय शिक्षण त्यांनी न्यू पुणे कॉलेज (परशुराम भाऊ कॉलेज जुने नाव) येथून बी.ए. व एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.

मराठी व संस्कृत विषयातून पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंमळनेर मधील प्रताप हायस्कुल मध्ये शिक्षकांची नोकरी पत्करली. गुरुजींना लहान मुलांचा लळा होता आणि ग्रामीण भागात काम करण्यात विशेष रस होता. शिक्षकांना मिळणाऱ्या पगारी पेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकवण्याची त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले होते. मुलांचे ते गुरुजींच नाही तर आई, वडील पालकही होते.

कारण वार्डनर म्हणूनही त्यांनी काम केले. शाळेत असतांना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक प्रकाशित करायला सुरुवात केली, जे की खूपच प्रसिद्ध झाले होते. साने गुरुजींचे जेवढे मुलांवर प्रेम होते तेवढेच प्रेम मुलांचे साने गुरुजीवर होते. येथे केलेल्या मेहनती मुळेच ते साने गुरुजी या नावाने मुलांमध्ये ओळखले जाऊ लागले. जो पर्यंत त्यांनी या शाळेत कार्य केले तो त्यांच्या जीवनाचा पहिला भाग होता.

महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह करीत दांडी यात्रेचे आयोजन केले. त्या सत्याग्रहात साने गुरुजी यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या जीवनातील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. वडील लोकमान्य टिळकांच्या विचारांशी सहमत होते. घरात तसे वातावरण नव्हते परंतु अधूनमधून विचारधारा चालत असे. भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना धुळे येथील तुरुंगात जेरबंद करण्यात आले ते 15 महिन्यांसाठी.

याच तुरुंगात त्याच कालावधीत विनोबा भावे दररोज गीतेवर प्रवचन देत असत, त्यांचा प्रभाव गुरुजींवर झाला. पुढे त्यांना तिरुचैन्नपल्ली येथे तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्यांनी तामिळ व बंगाली भाषा शिकली. यातूनच मग आंतरभारती चळवळ उदयास आली. सन 1942 च्या चले जावं आंदोलनाच्या माध्यमातून साने गुरुजीचा संपर्क मधू लिमये, कॉ. एस. एम. डांगे, एन. जी. गोरे, एस.एम.जोशी यांच्याशी आला.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे दार सर्वांसाठी खुले करावे म्हणून 01 मे ते 11 मे 1947 मध्ये आंदोलन करून ते यशस्वी केले. 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. जे की आजतागायत चालू आहे. यशोदाबाईच्या श्यामचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. प्रत्येक गुरुजीनी जर साने गुरूजी होण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात संस्कारमय विद्यार्थी नक्कीच तयार होतील. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

– नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक, मु. येवती ता. धर्माबाद  जि. नांदेड (9423625769)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!