दहा दिवसांपासून लहानग्यांसह कुटुंबाची होतेय उपासमार; उपनगर चौकात सोलापूर मधील कुटुंबाची दैना

jalgaon-digital
2 Min Read

उपनगर | वार्ताहर

लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही,  रोजगारची वानवा, त्यात कुटुंबातील लहान मुलांना दूध कुठून देणार? रोज भात खाऊन मुलं आजारी पडताहेत. किराणा, सकस अन्न नशीबी नाही. उपनगर सिग्नलवर गजरे विकणारे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले आहे.

सोलापूरमधील कुटुंब रोजीरोटी साठी नाशिकमध्ये साधारण वीस वर्षांपूर्वी आले. त्याठिकाणी रोजगार नसल्याने कुटुंबातील सदस्यांचे पोट कसे भरावे या चिंतेने नाशिकची पायवाट धरली,  असे कुटुंबातील ज्येष्ठ महिला सुनीता काळे यांनी सांगितले.

उपनगरच्या मनपा जॉगिंग ट्रॅक शेजारील मोकळ्या जागेत साधारण आठ पुरुष आणि सहा महिलांचे बिऱ्हाड पाल ठोकून राहत आहेत.  दिवसभर उपनगर सिग्नलवर भीक मागून किंवा गजरे, प्लास्टिक फुले यांची विक्री करून ते दिवस काढत आहेत.

गजरे विकून तुटपुंज्या पैशातून ते कुटुंबातील लहान मुलांना दूध व इतर पौष्टिक अन्न खाऊ घालण्याचा प्रयत्न करीत होते. पण लॉकडाऊन मुळे  सर्व रस्ते बंद झाले. रस्त्यावर चोवीस तास चालणारी वाहने थांबली अन त्यांची उपासमार सुरू झाली.

सिग्नलच बंद असल्याने त्यांचा रोजगार बुडाला. साधारण १२ दिवसांपासून त्यांच्या हातात पैसे पडले नाहीत. किराणा दुकानात गेल्यावर दुकानदार पैसे मागतात. कुटुंबात १० ते १२ लहान मुले एक ते आठ वर्षांच्या आतील आहेत.

त्यांना प्यायला दुध नाही. कुटुंबातील एक मुलगी तर एक वर्षाच्या आतील आहे. रस्त्याने जाणारे येणारे नागरिक किंवा स्वयंसेवी कार्यकर्ते त्यांना मसाले भाताची पाकिट रोज सकाळ-सायंकाळ आणून देतात. मात्र बंद काळात दिवसाच्या दोन्ही वेळेस रोज भात खाऊन त्यांच्या तब्येतीवर परिणाम पडू लागला आहे.

दुकानदारांना दूध साठी द्यायला पैसे नाहीत, दूध विना कुटुंबातील लहान मुलं आजारी पडू लागली आहेत. जुन्या नाशिक मधील काही दूध विक्रेते उपनगरच्या कॅनॉल रोड वरील झोपडपट्टीत कमी भावात दुध विक्री करता दोन दिवसांपूर्वी आले होते.

मात्र त्यांनीही दूध दिले नाही. लहान मुलांची उपासमार सुरू झाली आहे. आधार कार्ड व ईतर तत्सम कागदपत्रे त्यांच्या जवळ आहेत. मात्र या कुटुंबियांना कोणीच वाली नाही.

रोजगार गेल्याने लहान मुलांना कसा घास भरवावा?  रस्त्याने येणारे जाणारे खायला अन्नाची पाकिटे देतात. पण त्यात मोठ्या व्यक्तींचे पोट भरते. लहान मुलांना प्यायला बारा दिवसांपासून दूध नाही. गजरे विक्रीतून थोडेफार पैसे हाती येत होते. ते पण बंद झाले. आता गाड्याही बंद झाल्याने सोलापूरला कसे जायचे ?

  • सुनीता काळे
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *