श्रीराम रथाला झळाळी; चबुतराचे नूतनीकरण; एलईडी लाईटिंग

0
पंचवटी ।  श्रीराम नवमी नंतर येणार्‍या चैत्र शुद्ध एकादशीला काढण्यात येणार्‍या नाशिकमधील सर्वात मोठा श्रीरामरथोत्सव यंदा दि. 16 एप्रिलला होत आहे.

श्रीराम आणि गरुड या दोन रथापैकी यंदाच्या वर्षी श्रीरामरथाचा सुमारे 150 वर्षांपासून असलेला चबुतरा बदलण्यात आला आहे. रथाची रंगरंगोटी झाली असून यावेळी रथाला करण्यात येत असलेली विदयुत रोषणाईत बदल करण्यात आला आहे. रथाला एलईडी लाईटींग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

रथाचा बदललेला चबुतरा आणि नवीन स्वरूपातील एलईडी लाईटींगमुळे श्रीराम रथाला नवीन झळाळी प्राप्त झाल्याने श्रीराम भक्तांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

श्रीराम रथ ओढण्याचा मान असलेल्या सरदार रास्ते आखाडा तालिम सघाच्या संचलित श्रीराम रथोत्सव समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष राकेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यांपासून श्रीराम रथाचे काम सुरू होते.

यात दरवर्षीप्रमाणे रथाच्या चाकांना ऑईलिंग आणि ग्रीसिंग करण्यात आले. रथाची गॅलरी (चबूतरा) सुमारे 150 वर्षापुर्वीचा असल्याने त्याची लाकडे कुजल्याने समितीने चबुतरा बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने सागवान लाकडांपासून नवीन चबुतरा तयार करून घेण्यात आला आहे.

रथाला विविध रंग देण्यासाठी 30 लीटर ऑईल पेंटचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी रथाला रंगरंगोटीचे काम कारागिरांकडून करून घेतले जाते. मात्र, यावर्षी रथाचे सेवेकऱयांनी रंगकाम केले आहे.

रथाला एलईडी लाईटिंग बसविण्याचे कामाला शुक्रवारपासून सुरवात होणार आहे. श्रीराम रथावर असलेली विद्युत रोषणाई हे रथाचे आकर्षण असते. दरवर्षी करण्यात येणार्‍या विद्युत रोषणाईपेक्षा यंदाची रोषणाई आणखी आकर्षण ठरणार आहे. प्रथमच अशा प्रकारची एलईडी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

अध्यक्ष राकेश शेळके, उपाध्यक्ष स्वप्निल गवळी व अविनाश दीक्षित, कार्याध्यक्ष छोटूसिंग भोईर, प्रदीप भोईर, अरविंद विसपुते, रावसाहेब कोशिरे, सचिव रघुनंदन मुठे, सहसचिव सचिन लाटे, खजिनदार सुनील कोठुळे, सहखजिनदार कल्पेश दीक्षित, सदस्य नितीन शेलार, शशिकांत मुठाळ, सचिन म्हस्के, रोहन मुठे, राजकमल जोशी, हरीश टोरपे, सचिन जोशी, संतोष नाटकर, अनंता कोशिरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, भावीक रथोत्सवाच्या तयारीत गुंतलेले आहेत.

LEAVE A REPLY

*