Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिवारागृहातील काहीजण बनले स्वयंसेवक; लहान मुलांचे होते वेळोवेळी लसीकरण

निवारागृहातील काहीजण बनले स्वयंसेवक; लहान मुलांचे होते वेळोवेळी लसीकरण

नाशिक | कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे; त्यामुळे तात्पुरत्या निवारागृहांच्या कालावधी त्या अनुषंगाने वाढविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दीर्घकाळ तात्पुरती निवारागृहे चालवावी लागतील; अशा उपाययोजना केलेल्या असल्याने निर्वासितांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतून आपल्या गावाकडे निघालेल्या हातमजुरांपैकी २९५ मजुरांची इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मिडियम निवासी शाळेत तात्पुरते निवारागृह तयार करून तेथे व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यांना वेळेवर दोन वेळेचे जेवण दिले जात असून, वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी ही केली जात आहे. ‘इमर्जंसी ॲक्शन सेंटर’च्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरते रिलीफ कॅम्प, कार्यान्वित करण्यात आले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील एकलव्य इंग्लिश मिडियम निवासी शाळेत या निर्वासितांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारा केंद्रात एकूण २९५ हातमजूर असून, त्यात २०४ पुरुष, ५२ महिला व ३९ मुले आहेत. या सर्वांची उत्तम अशी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २६ निवारागृह कार्यान्वित असून, १ हजार ७९१ निर्वासितांची सोय करण्यात आली असल्याची श्री. मांढरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन जाहीर होताच अनेक स्थलांतरित आपल्या गावाकडे निघाले होते. त्यांना थांबवून त्यांच्यासाठी रिलीफ कॅम्पची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. लॉकडाऊनबाबत दीर्घकालीन उपाययोजना असल्याने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढला तरी प्रशासन सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तत्पर असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले.

प्रशासनाकडून २६ निवारागृहांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक निवारागृहाला एक नोडल अधिकाऱ्यासह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. इगतपुरी येथे २९५ निर्वासितांची सोय करण्यात आली असल्याची माहिती श्री. मुंडावरे यांनी दिली.

लहान मुलांचे वेळोवेळी लसीकरण

निवार्सितांमध्ये एकूण ३९ मुले असून, चहासाठी व मुलांसाठी एकूण ६० लिटर दूध मागविण्यात येते. लहान मुलांना दुधासोबत बिस्कीट व टोस्ट देखील दिले जात आहेत. गावातील लोकांसह इतर स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वेळोवेळी निर्वासिंतांची तपासणी केली जाते. लहान मुलांची तपासणी करून शेड्युलनुसार लसीकरण देखील केले जात असल्याची माहिती, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.

निर्वासीत बनले स्वयंसेवक

या निर्वासीतांपैकीच काही तरुणांना येथील निवारागृहात स्वयंसेवकाचे काम देण्यात आले आहे. हे स्वयंसेवक निर्वासीतांना सोशल डिस्टन्सिंग, स्व:स्वच्छता आदींबाबत माहिती देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या