साईंकितचे ‘रहस्यमयी’ पदार्पण

0
‘मिरांडा हाऊस’ हा रहस्यमयी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा टिझर आणि ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत अशी दमदार कलाकारांची फौज या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून साईंकित कामत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मालिकांमधून घराघरात पोहचलेला साईंकित आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्याच्या या पहिल्या सिनेमाच्या अनुभवाबद्दल बोलताना साईंकित म्हणतो “मी सुरुवातीपासूनच या चित्रपटासाठी खूपच उत्साहित होतो किंबहुना आहे.

एकतर पहिला चित्रपट तो पण रहस्यपट, उत्तम कथा, अनुभवी कलाकार आणि राजेंद्र तलक यांच्यासारखे हुशार, नेहमी दूरदृष्टी ठेवणारे आणि कामाबद्दल प्रचंड आदर, प्रेम असणारे दिग्दर्शक. हे सर्व इतकं सुंदर जुळून आल्यामुळे या चित्रपटाला नकार देण्यासाठी माझ्याकडे कारणच नव्हते.

माझा चित्रपटाच्या शूटिंगचा अतिशय सुंदर प्रवास होता. रहस्यमयी चित्रपट असल्यामुळे मला या चित्रपटाबद्दल जास्त काही सांगता येणार नाही पण हे नक्की सांगेल की, हा चित्रपट बघताना प्रेक्षक नक्कीच चित्रपटाशी समरस होतील. या चित्रपटाची कथा मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि मी या तीनच लोकांभोवती फिरते, पण या चित्रपटात या तीन लोकांसोबतच चौथे प्रेक्षकही सहज सामील होतील.

तसेच मिलिंद गुणाजी पल्लवी सुभाष यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत काम करायची संधी मला मिळाली त्यामुळे मी आनंदी आहे.”

ह्या चित्रपटाबद्दल खूप गुप्तता राखण्यात येत आहे. एवढंच काय पण, चित्रपटात कलाकार साकारत असलेल्या भूमिका आणि त्यांची नाव देखील अजून सांगण्यात आली नाहीये. त्यामुळेच की काय पण आता प्रेक्षकही या हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे. ‘मिरांडा हाऊस’ हा चित्रपट येत्या १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*