‘रंग’ व्यक्तिमत्वाबरोबरच घडवितात सकारात्मक बदल – सोनाली जोशी

0

नाशिक दि. १२ प्रतिनिधी | प्रत्येक रंगाला मूलतः एक व्यक्तिमत्त्व आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा एक रंग असतो. माणसाची जीवनशैली कालानुरूप बदलत चालली असून फॅशनच्या दुनियेत रंगाना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. रंग व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मकरित्या लोकांसमोर आणत असल्याने व्यक्तिमत्त्व विकासासाठी परिणामकारक ठरतात असे मत आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने गंजमाळ येथील सभागृहात ख्यातनाम आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी यांचे ‘आर्ट थेरपी’ विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले उपस्थित होते.

सोनाली जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, प्रत्येक व्यक्तिमत्त्वासाठी रंग असतोच. पण आपण आपल्यावर उठून दिसणारा म्हणून किंवा आवडता रंग म्हणून एखादाच रंग निवडतो. रंगांचं आपल्या आयुष्यातले महत्त्व हे किती महत्वाचे आहे, हे आपण फारसे गांभीर्याने घेत नसलो तरी आपल्याला कोणता रंग चांगला दिसेल या अनुषंगानेच प्रत्येक व्यक्ती कपडे घेते.

एखाद्याचा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन, त्याचे व्यक्तीमत्त्व त्याला एखाद्या रंगाकडे आकर्षित करू शकते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती ठराविक वेळी कुठल्या मानसिक अवस्थेतून जात आहे, त्यानुसारही रंगाची पसंती ठरू शकते. रंगाची निवड आणि व्यक्तिमत्त्व यांचे वेगळे नाते असते. कारण ह्या रंगांमुळे आपल्या मनातील नकारात्मक भावना नष्ट होवून सकारात्मक दृष्टिने विचार करण्यास मदत होत असते.

जाहिराती, फॅशन, सिनेमांमध्येदेखील रंग आणि व्यक्तिमत्त्व यांची सांगड वारंवार घातलेली पाहायला मिळते. आहे. किंबहुना नकारात्मक भूमिका असणाऱ्या कलाकारांना भडक आणि काळ्या रंगाचे कपडे दिले जातात. ‘कलर थेरपी’ ही थेरपी आर्ट थेरपीचाच एक भाग आहे जी आपल्या बेरंग, निराश, मानसिक, शारीरिक, आरोग्य बदलण्यास आणि नवी उमेद निर्माण करण्यात उपयुक्त ठरते. आर्ट थेरोपी ही संगीत, चित्र, शिल्प, गाणी, नृत्य आणि छायाचित्र अशा विविध स्रोतांतून नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत बदल घडवून आणते असेही श्रीमती जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला बेळे यांनी केले. प्रारंभी रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले यांनी प्रास्ताविक केले. तर सचिव मुग्धा लेले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंथ लीडर ओमप्रकाश रावत, उन्मेष देशमुख, मृदुला बेळे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*