Exclusive : योजना वनी, पन वावरमां नई पानी!

रिपोर्टर डायरी : मोसम खोऱ्यातील आणि मालेगाव तालुक्यातील दोन गावांची दशा

0

दिनेश सोनवणे | वडनेर-खाकुर्डी 

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथून खाकुर्डीकडे जायला निघालो. रस्त्याच्या कडेने दुतर्फा वाळवंटच दिसून येत होते.  मोसम नदीच्या खोऱ्याच्या कुशीत असलेल्या वडनेर आणि खाकुर्डी या गावांमध्ये एकदाचा पोहोचलो. गावात शिरल्यावर भले मोठे समाज मंदिर दिसले. गावातील काही वृद्ध मंडळी तिथे दुपारचे जेवण करून विश्रांती घेत होती.

राज्यातील दुष्काळ, सरकारी कामांची लागलेली वाट आणि गावातील भीषण पाणीटंचाईच्या मुद्द्यांवरून काहीजन पेपर वाचत २०१९ च्या निवडणुकीतील भाजप आणि कॉंग्रेसचे भविष्य रंगवत बसले होते.

एकजण मध्येच म्हणाला, आते इंदिरा कॉंग्रेस शिवाय पर्याय नही. मायना पंजा तव्हळ बी शाबूत व्हता, आजबी शाबूत शे…गरज शे, ती दिशानी!

गावाकडची अहिराणी येत असल्यामुळे मी आणि वाल्मिक ज्येष्ठांच्या या गप्पांमध्ये रंगलो. गडी आपलाकडला शे, असे म्हणत एकेकाने गावाबाबत वेगवेगळ्या गोष्टी ऐकवायला सुरुवात केली.

आदिवासी वस्तीतले आणि मागील पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत सदस्य असलेले नंदू खंडू गवांदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी फॉर्म भरले. झेरॉक्स वाल्यापासून इंटरनेट वाल्यापर्यंत सगळ्यांनी आमच्या आदिवासी बांधवांची  अक्षरशः लूटच केली.

मजुरी बुडवून तासनतास रांगेत उभे राहावे लागले, ठराविक हप्त्यांमध्ये रक्कम येईल असे अनेकांनी सांगतिले. मात्र अद्याप आवास योजनेचे एकही घर झाले नाही. सरकार राहील तर घर व्हतील नाहीतर हाई सरकार बी बोगस निन्घी जाई.

गाव हागणदारी मुक्त झाले आहे, पण स्वखर्चातून. असे एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले. जुने गुरुजी असतील बहुतेक ते, त्यांच्याकडे सरकारी योजनेची, योजना मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरतीची आणि एकूण गावाच्या भविष्याची इत्यंभूत माहिती होती. ते म्हणाले,  पंचक्रोशीतील हे एकमेव गाव असेल जिथे अद्याप शौचालयाचे अनुदानही रखडले असेल. परंतु, सरकारी चिरीमिरीची वाट न बघता आमच्या हुशार ग्रामस्थांनी स्वखर्चाने शौचालये बांधून घेत नवा आदर्श उभा करण्याचे काम केले.

वर्षानुवर्षे ज्येष्ठांचे ग्रामपंचायतीवरील वर्चस्व गेल्या पंचवार्षिकला नेस्तनाबूत होत युवा पिढीच्या हाती ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. त्यामुळे हा जो गावाचा विकास झाला तो गावातील तरुणाईमुळेच असे ठणकावून एका आजोबांनी सांगितले. गावात आरओचे पाणी नाममात्र शुल्कात पुरवले जाते, घरोघरी नळयोजना पोहोचली आहे. त्यामुळे गावाच्या पिण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला.

अनेक कामे वेळेवर होतीलही. पण ग्रामीण भागात अनेक ग्रामसेवकावर दोन गावांची जबाबदारी देण्यात येते. खाकुर्डी गावही त्यातलेच एक. अर्धवेळ असलेले ग्रामसेवक साहेब पूर्णवेळच गायब असतात असे एक सद्गृहस्थ म्हणाले. खरं पटत नव्हतं, ग्रामपंचायतीजवळ जाऊन बघितले तर भले मोठे टाळे लावलेले दिसून आले. टाळ्यावर मरणाची धूळ होती, खिडक्यांवर धुळीचा चर बसला होता, तेव्हा खरं पटलं इथे येण्यात कुणाला काही रस नसावा.

ग्रामपंचायतीच्या जवळून एक गृहिणी पाण्याचा हंडा भरून घराकडे निघाल्या होत्या. त्यांना विचारले, ग्रामपंचायत कधीपासून बंद आहे, त्या म्हणाल्या नेहमी बंदच असते. आज बंद आहे…यात काही नवीन नाही. पुढे त्या महिलेने  घटकाभर बघून मान फिरवत घराकडे कूच केली.

ग्रामसेवक गावात आठ ते दहा दिवसांनी फेरफटका टाकायला येतात, असे एका सुशिक्षित ज्येष्ठ नागरिकाने सांगितले पण यात कुठेही माझे नाव यायला नको, मला या वयात कुठलाही त्रास नको असेही ते म्हणाले. त्यामुळे त्यांचे नाव यात आलेले नाही.

गावाच्या पाण्याचा प्रश्न जरी मिटला असेल, तरीही अनेक शेतकऱ्यांनी उभी पिके पाण्याअभावी सोडून दिली आहेत. हा प्रश्न  कायमचा मार्गी लागल्याशिवाय या गावचा खरा दुष्काळ हटणार नाही. जे श्रीमंत आहेत, त्यांच्या जमिनी आज हिरव्यागार दिसतात. जे गरीब आहेत, त्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही, काठी टेकत-टेकत एक आजोबा एवढे सांगून तिथून जास्त चर्चा न करताच निघाले.

मोसम खोऱ्यात असलेल्या या गावावर आजही दुष्काळाचे तीव्र सावट आहे. ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची विहिरी वगळता शेतातील विहिरी कोरड्याठाक झाल्या आहेत. हा तिढा कायमचा कसा दूर होईल? याविषयी विचारले, तेव्हा एकजण म्हणाले, दोन्ही गावांनी एकत्र येऊन हरणबारीच्या पाण्यासाठी लढले पाहिजे, दुसरे म्हणाले गावात केटी वियर असले तर पाणी जमिनीत मुरेल आणि विहिरींना उतरेल.

यावर पूर्वीचे राजकारणी आता सर्वच क्षेत्रातून निवृत्ती घेतलेले आजोबा म्हणाले, अनेक दिवसांपासून केटी वियर (कोल्हापूर टाईप बंधारा) नदीवर बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण दोन्ही गावांच्या गचाळ राजकारणात आजवर केटीवियर बांधण्यात आले नाही.

केटी वियर बांधले तर वडनेरची बाजारपट्टी पाण्याखाली जाईल म्हणून ग्रामस्थांचा विरोध असल्याची माहिती खाकुर्दीच्या सरपंच कमलबाई ठाकरेंनी दिली. गावाच्या विकासाबाबत बोलताना कमलबाई म्हणाल्या, गावात आजार नाहीत, प्राथमिक उपकेंद्रात औषधे उपलब्ध आहेत. गावातील कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी नुकतीच ग्रामपंचायतीने घंटागाडी विकत घेतली आहे. आजपासून गावात ही घंटागाडी फिरणार होती पण चालकाने मनावर घेतले नाही म्हणून राहिलं.

सरपंचांच्या घरून निघालो. गल्लीबोळातून वाट काढत पुन्हा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. समाजमंदिरात एकही ज्येष्ठ नागरिक दिसून आले नाहीत. एकास विचारले, इथे बसलेले आजोबा कुठे गेले? तो उत्तरला, त्यांची झोपायची वेळ झाली आता ते सायंकाळी चारचा चहा घेऊनच पुन्हा गावात येतील. तुम्हीही तेव्हाच या…

मोसम नदीवरचा पुल ओलांडून पाचशे फुटावरून वडनेर गावात पोहोचलो. गावात मुख्य रस्त्यावर गुडी शेव, रेवढी, भेल भत्त्याची दुकान सजली होती. एका दुकानाजवळ दुचाकी थांबवत एक सदगृहस्थाला विचारलं, ग्रामसेवक भेटतील का? ते म्हणाले रविवार आहे, बहुतेक आज ते नसतील. तुम्ही उद्या या तेव्हा भेट होईल.

 

हा सद्गृहस्थ एवढ्या आत्मविश्वासाने ग्रामसेवकाची गॅरंटी कशीकाय देतोय? मला प्रश्न पडला होता. पडायलाच हवा कारण खाकुर्डीच्या ग्रामसेवकाचा प्रताप ऐकून मला अर्धा तासही झाला नव्हता.

पुढे या सदगृहस्थाला नाव विचारलं, राजेंद्र शिवदे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मी वडनेरच्या ग्रामपंचायतीत कारकून आहे. म्हटल, सरपंच आणि ग्रामसेवक नाही भेटले म्हणून काय झाले, त्यांचा चेला तर भेटला. मग मी गाडी बाजूला लावत त्याच्याशी चर्चेला लागतो.

सुरुवात ग्रामसेवकापासून झाली. ते म्हणाले, आमच्या गावाचे ग्रामसेवक एम.डी. शिंदे गावातच असतात. त्यांच्यामुळे आज गावात अनेक बेघरांना घर मिळाली. सरकारी अधिकारी काय करू शकतो याचे उदाहरण मला मिळाले. खाकुर्डीचा पदभार यांच्याकडेच दिला असता, तर खाकुर्डीवासियांचे घरांचे स्वप्नही पूर्ण झाले असते असे मला वाटत होते.

वळवाडे आणि खाकुर्डीचे अंतर बरेच आहे. त्यामानाने, वडनेर आणि खाकुर्डीमध्ये फक्त मोसम नदीपात्र आडवे आहे. तरीही वेगवेगळे ग्रामसेवक दिले आहेत. शेवटी नियम तो नियम सरकारी निकषापुढे कुणाचे काही चालत नाही. ठराविक कालावधीत बदली होऊन पुन्हा गणिताच्या पहिल्या पाढ्यापासून गावाच्या विकासाचा पाढा सुरु होतो.

वडनेर गावात प्रधानमंत्री आवास योजनेची कामे झाली आहेत. जवळपास ६०-७० टक्के लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. आज गाव झोपडपट्टीमुक्त झाले आहे पण पायाभूत सुविधांची परवड असल्याची खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली.

गावाचा विकास ग्रामपंचायतीपासून किंवा सरपंचाच्या घरापासून होई. पण वडनेर गाव त्याला अपवाद आहे. गावात भूमिगत गटारी करण्याला सुरुवात होणार होती, सुरुवात कुठून करावयाची याबाबत विचार मंथन सुरु होते.

तर येथील राजवाड्यापासून भूमिगत गटारी करण्यास सुरुवात झाली. गावातील आजार पळवून लावण्यात गावातील प्रत्येकाने पुढाकार घेतला. आज गाव ६० ते ७० टक्के हागणदारी मुक्त झाले आहे. विशेष म्हणजे, अनुदानही सर्वांना मिळाले आहे.

वडनेरमधून निघालो, रावळगावला पुन्हा जायचे होते, वाल्मिकची गाडी तिथे होती. रस्त्याने अनेक व्यावसायिक टमाटे, वांगी, शिमला मिरचीचे एकावर एक ठेवत असे सात-सात कॅरेट माल दुचाकीवर ठेवलेला दिसून आला. येथील शेतकऱ्यांना विचारले, ते म्हणाले, नदीला पाणी नव्हते, नदीकाठच्या विहिरींना तळ गाठला आहे. म्हणून आहे त्या पाण्यात भाजीपाला लागवड करून अनेक शेतकरी तालुक्याच्या गावाला बाजारासाठी जातात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.

एकूणच, दोन गावं…मोसम नदीचा अवघा काही फुटांचा पूल त्यांच्यात आडवा आहे. तरीही एवढा विरोधाभास बघायला मिळाला. खाकुर्डी गाव दुपारी भकास तर वडनेरमध्ये गर्दी मावत नव्हती. काय कारण असेल बर?…अनेक ठिकाणी जवळ-जवळच्या गावांची नावे सोबत घेतली जातात. सुरुवातीला अमुक गावाचे नाव का घेतले जात असावे? याचे उत्तर तिथेच मिळाले होते.

LEAVE A REPLY

*