Type to search

Video : दुंधेचे धरण, वेड्या बाभळीचे साम्राज्य आणि वॉचमन पोऱ्या

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

Video : दुंधेचे धरण, वेड्या बाभळीचे साम्राज्य आणि वॉचमन पोऱ्या

Share

दिनेश सोनवणे | मालेगाव

एकेकाळच्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे, देवळाणेहून सुराणे मार्गे थेट मालेगाव आणि बागलाण तालुक्याच्या सीमेवरील व मालेगाव तालुक्याच्या हद्दीत असलेल्या दुंधे येथे पोहोचलो.

चौफुलीवर काहीजण उभे होते त्यांना सहज म्हणून विचारले, ‘काय म्हणतो पाऊसपाणी? त्यातील एकजण म्हणाले, ‘डोक्यावर सकाळी साडेनऊला जे ऊन लागतंय यावरून लावा तुम्हीच अंदाज? त्यांचे उलट उत्तर. जरा उपरोधिक वाटले, पण दुष्काळाची शेतकऱ्यांना बसलेल्या झळीबद्दलही सांगून गेले.

वायगावात सुराणे गावातील सोसायटीचे चेअरमन दीपक ठोके भेटले. शेती आणि पाऊसपाण्याच्या विषय निघाल्यावर गावालगतच्या धरणाबद्दलही बोलणे झाले. म्हणाले आपण गावातील पुढाऱ्याच्या घरी जाऊ त्यांनाही सोबत घेऊ. त्यांना माहिती आहे या धरणाबद्दल.

म्हटले सुरुवातीला एक पाऊस पडला त्यानंतर वाट बघून-बघून चार महिने निघून गेले, आज प्यायलाही पाणी नाही.

मग ते स्वत:च पुढाऱ्याच्या घराकडे निघाले. थोडे थांबा, आलोच म्हणाले. पण थोड्याच वेळात तावातावाने बोलत परत येताना दिसले. एकूण त्या पुढाऱ्यांनी त्यांना टोलवले होते. मग त्यांनी स्वत:च गावातली ८-१० मंडळी गोळा केली आणि आम्ही सर्वच मग धरणाच्या बांधावर पोहोचलो. गर्दी बघून दुंधे गावातील काही ग्रामस्थ आले. सुराणे येथील महिला सरपंचांचे पतीही कानाला ब्लूटूथ लावून ऐटीत दाखल झाले.

धरणाच्या बांधावरून पाण्याचा अंदाज घेत पश्चिमेला बघत होतो. तेवढ्याच साठी ओलांडलेले एक आजोबा म्हणाले, ‘तो बघा, त्या मंदिराचा कळस दिसतोय ना? तिथपर्यंत या धरणाचा फुगवटा आहे’

त्या अनुषंगाने मग धरणात बघितले, तर जाडभोर काटे असलेल्या वेड्या बाभळीचे साम्राज्य पसरलेले दिसून आले. काही ठिकाणी शेतीही दिसून आली. धरणात शेती कशी काय? असे विचारल्यावर आजोबा म्हणाले, ‘पूर्वी काही शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या होत्या. मध्यंतरी पाऊस चांगला पडला आणि धरणात पाणी साठले. पण नंतर धरण आटू लागले. त्यामुळे या गाळपेऱ्याच्या जमिनीत शेतकऱ्यांनी पुन्हा अतिक्रमण करून शेती करण्यास सुरुवात केली.’

ज्या गावात नदी नाही, त्या गावाची जीवनवाहिनी असतात पाझर तलाव, छोटे धरण किंवा गावातील नाले. मालेगांव तालुक्यातील दुंधे हे गावही त्यातीलच एक. बागलाण तालुका आणि मालेगांव तालुक्याच्या सीमेवरील हे गांव.
गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजार असेल. धरण बांधले तेव्हा येथील कारकुन दुंधे गावाचा होता म्हणून धरणाला दुंधे हे नाव दिल्याचे सुराणे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले.

गावात धरण असले तरी पाण्यासाठी दोन्ही गावं वेळोवेळी पाठपुरावा करतात. गेल्या २५ वर्षांपासून या गावाचा पाण्यासाठी लढा सुरु आहे. अद्याप याठिकाणी कोणत्याही धरणाचे पाणी आणण्यास शक्य झाले नाही. गेल्या 12 वर्षांपासून हे धरण कोरडेठाक आहे.

सन 1985 साली हे धरण बांधले, त्यानंतर 1993 मध्ये एकदा आणि नंतर 2006 मध्ये हे धरण भरल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर आजवर या धरणात पाण्याचा थेंबही पडला नाही. पाणी नसल्याने धरणांत सध्या वेड्या बाभळांचे राज्य आहे.

साडेतीनशे हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी शेतकर्यांनी दिली. तुटपुंज्या मोबदल्यात जमीन गमावल्याने शेतकरीदेखील विवंचनेत आहेत.

सुराणे( ता.बागलाण) आणि दुंधे (ता. मालेगाव) येथील ग्रामस्थ

धरण भरत नाही, पावसाने दडी मारली, उभी पिके करपली, पाईपलाईन करणे खर्चिक आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्यांना येथे मजूरीशिवाय पर्याय नाही. धरणात हरणबारी किंवा केळझर धरणातून पाणी आणण्यासाठी वर्षानुवर्षे येथील शेतकरी प्रयत्न करत आहेत. पण आश्वासनांच्या पलिकडे त्यांना आजवर काहीही मिळाले नाही.

एक गावकरी म्हणाले, ‘मागच्याच आठवड्यात याच भागात पालकमंत्री गिरीष महाजन दुष्काळी दौर्यावर आले होते. आमच्या गावात त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. गावांत काही शेतकर्यांनी दुरवरून पाईपलाईन करून पाणी आणल्याने तेवढा भाग सधन दिसतो. मंत्री गावांत आले…त्यांनी हिरवळ बघितली तर ते धरणांत पाणी देण्याला प्राधान्य देणार नाहीत. म्हणून मग जेवण बागलाण तालुक्यात असलेल्या शेजारच्या वायगाव येथे ठेवण्यात आले.’

त्यांच्या बोलण्यातून वरकरणी गंमत वाटली, पण त्याआड त्यांची पाण्यासाठी असलेली व्यथाही लपून राहिलेली नव्हती.
‘एकदा का धरण भरलं की चार- सहा वर्ष दुष्काळाची चिंता नाही’, येथील शेतकरी दशरथ पुंडलिक खैरनार सांगत होते.
दुष्काळावर तात्पुरते उपाय होतात, पण नंतर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न. आतातरी सरकारने त्यावर कायमस्वरूपी उपाय करावा असे ग्रामस्थांना वाटते.

केळझरच्या आठ नंबर चारीचे पाणी धरणात आणता येईल, असे सुरवातीला सांगितले होते. पण प्रत्यक्षात ते शक्य होणार नाही. कारण धरण उंचीवर आहे. पाणी येणार कसे? गावकऱ्यांनी भौगोलिक अडचण सांगितली.

आता तर शेतकऱी इतके संवेदनशील झाले आहेत की धरणात पाणी कुठूनही आणा, पण आणा अशी मागणी करत आहेत. अनेकांनी तर मंत्रालयापर्यंत खेट्या घातल्या. बागलाण तालुक्यातील वीरगाव येथे आंदोलन केले. शिर्डी हरणबारीचे शिष्टमंडळ मंत्र्यांना जाऊन भेटले. तेव्हाही आश्वासन दिले गेले. सर्व्हे लवकरच होईल असे सांगण्यात आले. परंतु या गोष्टीलाही दोन महिने उलटले अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हा भाग धुळे लोकसभा मतदार संघात येतो. येथील खासदार डॉ सुभास भामरे यांच्याकडून सध्या मुलभूत सुविधांवर भर दिला जात आहे. एकीकडे केंद्रात संरक्षण राज्यमंत्रीपदासारखी महत्त्वाची धुरा असूनही मतदार संघातील कामेही ते तितक्याच गांभिर्याने पूर्ण करत आहेत. त्यांनीही या गावाबद्दल आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून गावाला अपेक्षा आहेत.

‘आमच्या गावाला केळझर किंवा हरणबारीचे पाणी कोणतेही शक्य असेल ते आणावे. प्रसंगी गावकरी लोकसहभागातून मदत करू,’ येथील शेतकरी नितीन देवरे म्हणाले.

या प्रकल्पात सुराणे गावच्या 50 टक्के जमिनी गेल्या आहेत. बेरोजगारीमुळे उच्च शिक्षण घेउनही अनेकांना मजूरी करावी लागते आहे. या धरणांत पाणी आले तर तरुण शेतकरी वर्ग शेती करण्यासाठी पुढे येईल. माणसांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी मिळेल.

मालेगाव तालुक्यातील सातमाने, दुंधे, वायगांव, पिंपळगांव व बागलाणमधील सुराणे, देवळाणे येथील शेतकरी प्रगतीशील होतील’ दीपक बाबुलाल ठोके भविष्य रंगवत होते.

‘धरणात 1985 पासून जमीनी गेल्या. सुरूवातीता धरणामुळे परिसराला नवसंजीवनी मिळेल असे वाटायचे. पण बांधल्यापासून दोनदाच धरण भरले. अनेकांच्या जमिनी गेल्या. प्रकल्पग्रस्त राहूनही पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही. परिणामी अनेकांना रोजगार व नोकरीच्या शोधात गाव सोडायची वेळ आली. पाणीच नसल्याने शेती बहरली नाही आणि गावाला आर्थिक प्रगतीही साधता आली नाही. गावाचा विकासच खुंटला. आता तर नजर पुरणार नाही तिथपर्यंत कोरडवाहू शेती नजरेस पडते,’ दशरथ खैरनार कळकळून सांगत राहिले.

आज या गावात स्मार्टफोन आहेत, सिंगल फेज वीजही २४ तास आहे. नळयोजना आहे. घरकुल योजनेचा लाभही अनेक ग्रामस्थांनी घेतला आहे. गावातील अनेक तरुण बाहेरगावात नोकरी करतात. सटाणा शहर किंवा रावळगाव आणि मालेगाव येथे अनेकांची मुले शिक्षण घेत आहेत. नामपूर येथेही काही मुले शिक्षणासाठी जातात. गावाचे मनुष्यबळ बाहेर जातेय.

‘एका अर्थाने या कोरड्या धरणामुळे चांगलाच विकास झाला, पण आमच्या गावचा नाही. तर दुसऱ्या गावातील शहरातील लोकांचा, उद्योग व्यवसायांचा. कारण आमच्याकडचे सर्व हरहुन्नरी लोकच आज तिथे नोकरी करत आहेत.’ धरणावर भेटलेले आजोबा विषन्नपणे सांगत होते.

गावात डाळिंब, मका, बाजरी तुरळक कपाशी लावलेली दिसून आली. भाजीपाल्याचे मोठे मार्केट मालेगावमध्ये असल्यामुळे काही शेतकरी भाजीपाल्याकडे वळले आहेत. पण असे शेतकरी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. ज्यांच्याकडे आर्थिक आणि राजकीय ताकद होती, त्यांनी लांबवरून पाईपलाईन केली. मात्र असंख्य सामान्य लोक कोरडवाहूच राहिले, ‘मना पोऱ्या सटाण्याले वॉचमन शे, ना भो, तो जे कमाडस त्यानावर घर चालस!’  असं डोळ्यातलं दु:ख लपवत सांगत राहिले.

‘एक चांगलं झालं बाबा, धरणात वेड्या बाभळी उगवल्या आणि उघडं धरण झाकलं गेलं, धरणाची इज्जत तर राहिली ना’…निरोप घेताना गावातले आजोबा हे वाक्य म्हणाले. त्यामुळे परतीच्या रस्त्यात आपल्याला उगाचच वेड्या बाभळीबद्दल प्रेम वाटू लागते…!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!