Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

अनाथांकडे बालपणाचे फोटोच नसतात, तर शेअर कसे करणार ?

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक दि. १४ | सोशल मीडियावर अनेकजण आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून बालदिनाचा आनंद घेत आहेत, त्याचवेळेस समाजातील काही जण असेही आहेत हे फोटोसुद्धा त्यांच्याकडे नाहीत… कारण कौतुकाने फोटो काढायला लागतात आई-वडील किंवा जवळचे म्हणता येतील असे नातेवाईक.

कायद्याचे शिक्षण घेणारी आणि सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिलेली सुलक्षण नानाजी आहेर ही तरुणी त्यांच्यापैकीच एक. ती अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करते की ज्यांना आपल्या बालपणीच्या साध्या आठवणीही जपता आलेल्या नाही. आपले आईवडील कोण? आपण इथे आलो कसं? काहीच माहिती नाही. मागे वळून बघितले तर अनाथ आश्रमाशिवाय दुसरा निवाराही माहिती नाही. मात्र, अनाथाश्रमात राहून कुणी सैन्यात कमांडो होऊन २६/११ च्या हल्ल्यात योगदान देतं. कुणी नोकरी करतं, कुणी वृद्धाश्रम चालवितो….. समाजातील अनाथांना बळ देणारी सुलक्षणा त्यातूनच घडली आहे. परिस्थितीशी लढण्यासाठी कायद्याचं शिक्षणही ती घेत आहे.

सुलक्षणा सांगते की केवळ १३ दिवसांची असताना ती आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या बहिणीला आधार आश्रमाच्या पायऱ्यांवर आणून ठेवले. सोबत चिठ्ठी होती, त्यावर जन्मतारीख आणि कुटुंबियांचे आडनाव इतकीच माहिती होती. पुढे बालपण एका आश्रमात, किशोरावस्था दुसऱ्या आश्रमात आणि दहावीनंतर तिसऱ्याच एका आश्रमात दिवस काढावे लागले. आईवडिलांची ऊब मिळाली नाहीच, पण कपडे, आरोग्य, जेवण सर्वांचीच आबाळ झाली.

शासकीय नियमाप्रमाणे अठरा वर्षांची झाल्यावर आश्रम सोडावा लागला. दोन दिवस नाशिकच्या बस स्टँडवर उपाशी काढले. नंतर एका कुटुंबात घरकाम करून शिक्षण घेतले. प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रसंगी अर्धपोटी राहावे लागले. पण या सर्वांवर मात केली. समज आली तेव्हा लक्षात आले की आपल्यासारखे अनेकजण आहेत, त्यांना आधाराची गरज आहे. आपले हक्क काय? कायदा काय? याबद्दल सांगण्याची गरज आहे. मग त्याच कामाला वाहून घेतले. ‘अनाथांचा आधार’ ही संस्था सुरू केली. माझ्याप्रमाणेच जे अनाथ स्वत:च्या पायावर उभे होते, त्यांना एकत्र केले आणि सुरू झाला अनाथांना स्वनाथ करण्याचा प्रवास.

तुम्ही अपंगांना दिव्यांग म्हणता,  तसे अनाथांना ‘स्वनाथ’ म्हणून संबोधायला हवे, असे परखड मत सुलक्षणा मांडते. अनाथ मुलांच्या समस्या खूप आहेत. त्यातही मुलींच्या तर खूपच अनेक मुलींचे अठराव्या वर्षी संस्थेतर्फे लग्न् लावून दिले जाते. त्यातील अनेक पुरुष हे विकृत निघाले, काहींनी ‘अनाथ’ असल्याने या मुलींना मारहाण करण्यापासून ते त्यांची विक्री करण्यापर्यंतचे गैरप्रकार केले. अनेकदा ‘अनाथ आश्रमातून मुली पळून गेल्या’ अशा बातम्या प्रसिद्ध होतात. पण वस्तूस्थिती तशी नाही, बहुतेक प्रकारात आश्रमातील कर्मचारीच पैसे घेऊन त्यांचे लग्न लावणे, प्रसंगी विक्री करण्याचे प्रकारही उघड झाल्याचे सुलक्षणा सांगते.

अनाथ मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित असतो. शाळेत शिक्षकही दुर्लक्ष करतात, शेवटच्या रांगेत बसवितात. अभ्यास तपासत नाही. अनाथ आश्रमात मुली जसजशा वयात येऊ लागतात. तसतशा त्यांचे प्रश्न अधिकच वाढत जातात. मासिक पाळी काय असते? दर महिन्याला कशाप्रकारे सामोरे जायचे? हे त्यांना कुणीच सांगत नाही.  मुलींना याकाळात खऱ्या आधाराची गरज असते. ती त्यांना त्यावेळी मिळायला हवी दुर्दैवाने ती त्यांना मिळत नाही. त्यासाठी मी काम करत असून आज अनेक खेडोपाडी जाऊन नॅपकिन वाटपाचा कार्यक्रमच मी हाती घेतला आहे. यात अनेक संस्था माझ्यासोबत काम करत असल्याचे ती पोटतिडकीने सांगते.

शासनाचे अनाथ मुलामुलींसाठी अनेक योजना आहेत. यात अ, ब, क अशा श्रेणीदेखील आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ कागदावरच दिसतो. अनाथांमध्येच गट पाडण्यात आल्यामुळे अनेक लाभांपासून वंचित राहावं लागते आहे. मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया खूप अवघड केली आहे. त्यामुळे दत्तक घेणाऱ्या मुलांची संख्या घटली असल्याचेही तिने सांगितले. अनाथांसाठी सरकार मानधन देते, पण ते त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. गेल्या पाच वर्षांपासून अनाथांच्या वर्गीकरणानुसार त्यांच्याबद्दल कायदे करावे म्हणून आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटले, पण कुणालाच अनाथांच्या प्रश्नामध्ये रस नसल्याची खंतही सुलक्षणा बोलून दाखविते.

मुलांचे अठरा वर्षे आणि मुलींचे २१ वर्षे वय पूर्ण झालं की त्या या आधारश्रामातून बाहेर पडतात. बऱ्याच ठिकाणी निराधार मुलींचे लग्न संस्थेकडून लावले जाते. मात्र, पुढे या महिलांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांना माहेरचा आधार असा नसल्याने सासरच्यांकडून त्रास दिला जातो. इगतपुरी तालुक्यातील एका प्रकरणात मुलीच्या सांगण्यावरून आम्ही तिच्या घरी गेलो. त्यांना ती मुलगी काय करू शकते हे सांगितलं. तुम्हाला कशाप्रकारे त्रास होईल याची जाणीव करून दिली. आज त्या मुलीचा संसार खूप चांगला सुरू आहे.

सध्या सुलक्षणा अशा सर्व अनाथ मुलांना एकत्र करते, त्यांच्या हक्कासाठी लढा देतानाच त्यांना दिवाळी सारखे कार्यक्रम साजरे करून त्यांना मायेची ऊब कशी मिळेल यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नशील असते. सर्व अनाथ मुलांना आपल्या हक्काचे घर मिळेल, ते सामान्य जीवन जगू शकतील आणि समाज त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल, तो माणुसकीच्या इतिहासातील सुवर्णक्षण असेल असे ती सांगते.

(डिजिटल लाईव्ह : दिनेश सोनवणे, गोकुळ पवार)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!