आधार लिंक नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची माहिती आता ऑनलाईन

धान्याच्या काळ्या बाजारावर बसणार अंकुश

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी
एईपीडीएस ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार जोडणी न झालेल्या कार्डधारकांना बायोमेट्रिकद्वारे धान्य वितरण करता येत नसल्याने पुरवठा निरीक्षकांच्या अंगठ्याने अर्थात रुट नॉमिनीद्वारे धान्य वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या रुट नॉमिनीची माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनाही ऑनलाईन दिसत असल्याने आता त्यातही कुठलाही सावळागोंधळ करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून धान्याच्या काळ्या बाजारावर पूर्णपणे अंकुश बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील सर्वच त्रुटी दूर करत अत्यंत पारदर्शकपणे खर्‍या गरजू लाभार्थ्याला रेशनचे धान्य वितरणासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. परंतु बहुतांशी कार्डधारकांच्या घरातील एकाही सदस्याची आधारसोबत जोडणीच झालेली नाही. त्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीत थम घेता येत नसून पॉस मशीनद्वारे धान्यही वितरण करता येत नाही.

त्यामुळे आता पुरवठा निरीक्षकांना रुट नॉमिनी म्हणून शासनाने अधिकार दिले आहेत. ज्या ग्राहकांना धान्य देता येत नसेल अशांना पुरवठा निरीक्षकांनी संबंधित दुकानात जाऊन थम दिल्यानंतर लागलीच धान्याचे वितरण करण्यात येते. दरम्यान, याचवेळी दुकानदारांनी संबंधित कार्डधारकांच्या आधारच्या जोडणीची प्रक्रिया करून ते जिल्हा पुरवठा विभागाकडे ऑनलाईन सादर करावयाची आहे.

त्यामुळे पुढील महिन्यात कार्डधारकांच्या थमद्वारेच त्याला धान्य वितरण करता येईल. परंतु दुकानदार आणि पुरवठा निरीक्षकांच्या आपसी एकजुटीनेही यात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने या रुट नॉमिनींवरही लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याकडून केले जाणारे व्यवहारदेखील ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकर्‍यांसह पुरवठा सचिवांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मध्यंतरी ती बंद झाली होती. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना याबाबत माहितीच मिळत नव्हती. परंतु आता ती पुन्हा सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दोन हजारावर व्यवहार रुट नॉमिनीद्वारे झाले आहेत.

LEAVE A REPLY

*