रेशन लाभार्थीच गहू, तांदूळापासून वंचित; धान्य संपल्याची उत्तरे; गोरगरिबांची उपासमार

रेशन लाभार्थीच गहू, तांदूळापासून वंचित; धान्य संपल्याची उत्तरे; गोरगरिबांची उपासमार

नाशिक । प्रतिनिधी

करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन आहे. या परिस्थितीत गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी रेशन दुकानावर दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ दिले जाणार होते. मात्र, रेशन दुकानदार कार्डधारकांना त्यांचे नियमित महिन्याचे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. धान्य संपल्याचे उत्तरे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

लाॅकडाऊन काळात उद्योगधंदे, व्यवसाय सर्व काही ठप्प आहे. रोजंदारी बंद असल्याने ज्यांचे हातावर पोट हे त्यांची उपासमार होणार होती. ते बघता गोरगरीब जनतेला तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते.

रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ केंद्र शासनामार्फत मोफत देण्याची ही घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या चालू महिन्याचे धान्य रेशन लाभार्थ्यांना दिले जात आहे .त्यातही अनेक लाभार्थ्यांना धान्य संपल्याची उत्तरं रेशन दुकानदारांकडून दिली जात आहे.

विशेष म्हणजे चलन पास करताना लाभार्थ्यांची संख्या आणि एकूण धान्य यानुसार ती पास केली जातात. अशा वेळी संबंधित रेशन दुकानदारांकडे ग्राहक धान्य नेण्यास गेले की रेशन संपल्याचे उत्तरे दिली जात आहे. दुकानदारांकडून गोरगरीब जनतेला वेठीस धरत त्यांची पिळवणूक केली जात आहे.

यंत्रणेकडून काही दुकानदारांवर ती तपासणी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे . धडक कारवाई सुरु असून देखील रेशन दुकानदार या संकट समयी लाभार्थ्यांना रेशन देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कार्डधारकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. याबाबत दुकानदारांकडून योग्य अशी उत्तरेही दिली जात आहे. या प्रकरणी पुरवठा विभागाने काही रेशन दुकानदारांविरुध्द कारवाई केली आहे.

१८ हजार टन तांदळाची मागणी

केंद्र सरकारतर्फे रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो माेफत तांदुळ दिला जाणार आहे. नाशिक
जिल्ह्यातील ३५ लाख लाभार्थ्यांसाठी १८ हजार मेट्रीक टन तांदळाची मागणी पुरवठा विभागाने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एफसीआय) नोंदविली आहे. पुढील आठवड्यात हा तांदूळ उपलब्ध होइल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com