Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

विकासपुरुष की संधीसाधू? नगराध्यक्ष किरण डगळे यांचा शब्दप्रहार

Share

नाशिक । विशेष प्रतिनिधी

स्वत:ला सिन्नर तालुक्याचे विकासपुरुष म्हणून घेणार्‍याने आजपर्यंत ज्या-ज्या संस्थांमध्ये काम केले, त्या संस्थांना आर्थिकदृष्ट्या रसातळाला नेऊन स्वत:चे हित साधून घेण्याचा गोरखधंदाच केला आहे. सिन्नर शहराच्या विकासासाठी आणलेल्या निधीवर डल्ला मारणार्‍या या विकास पुरुषाने जादा दराने निविदा देऊन नगर परिषदेला करोडो रुपयांना रसातळाला नेल्याचा शब्दप्रहार नगराध्यक्ष किरण डगळे यांनी ‘देशदूत’शी बोलताना केला.

सिन्नर शहरासाठी शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना आणली असा गाजावाजा करणार्‍याने योजनेचे इस्टीमेट 100 कोटीपर्यंत वाढवले होते. मुळात ही योजना कधीच शंभर कोटींची नव्हती. सिन्नरकरांना नेहमीच शंभर कोटींचे गाजर दाखवले.

प्रत्यक्षात शासनाच्या तंज्ञानी त्यातील वारेमाप खर्चाला कात्री लावत ही योजना 66 कोटींवर आणली. मात्र, या विकास पुरुषाने सिन्नरकरांच्या पाठीत खंजीर खुपसत आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला 23 टक्के जादा दराने हे काम देऊन नगर परिषदेचे नुकसान केले. संपूर्ण महाराष्ट्रातील इतर नगर परिषदांच्या पाणीपुरवठा योजना इस्टीमेट दराने ठेकेदारांना दिल्या जात असताना 23 टक्के जादा दराने काम देऊन नगर परिषदेवर 17 कोटींचा अतिरिक्त बोजा टाकण्याचे काम विकास पुरुषाने केले.

पहिल्या 66 कोटींत नगर परिषदेचा वाटा 10 टक्के होता. विकासपुरुषांचा भविष्याचा वेध घेण्याचा मोठा सोस असल्याने नगर परिषदेचा बोजा 23 कोटींच्या पुढे नेऊन ठेवला. हे पैसे वाचले असते तर उपनगरांसह शहराच्या विविध भागात विकासाची अनेक कामे करता आली असती. मात्र, लोकहितापेक्षा स्वत:च्या व बगलबच्चाच्यया हितालाच प्राधान्य देणार्‍या विकास पुरुषामुळेच पाणीपुरवठा योजनेचे कामही ते लवकर पूर्ण करू शकले नाहीत. कडवा धरणापासून सोपी कामे तातडीने पूर्ण केली.

मात्र, पाईप लाईनला अडथळा करणार्‍या शेतकर्‍यांची समजूत घालून कामातले अडथळे कमी करण्याऐवजी वाढवण्याचेच काम त्यांनी केले. अडवणूक करणार्‍यांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचे गेल्या दोन-अडीच वर्षांत आम्हाला आढळून आले असून त्यांनी उभ्या केलेल्या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत आम्ही ही योजना पूर्णत्वाला नेली आहे. मे महिन्यात पाण्याच्या टेस्टिंगलाही सुरुवात होणार असल्याचे डगळे म्हणाले.

सिन्नर नगर परिषदेसारख्या छोट्या शहराला नाट्यगृहासारखा पांढरा हत्ती पोसणे शक्य नाही, हे माहीत असतानाही विकास पुरुषाने नाट्यगृहाचा अट्टाहास केला. स्वत:ला विकासपुरुष सिद्ध करण्यासाठी 7 कोटींचा नगरोत्थानचा निधी या नाट्यगृहावर खर्च करण्यात आला असून या निधीतून अनेक उपनगरांना भौतिक सुविधा पुरवणे सहज शक्य झाले असते. विकास पुरुषाच्या दूरदृष्टीनेच उपनगरे उपेक्षित राहिले असून नगर परिषदेचा हक्काचा निधी भलतीकडेच खर्च करण्यात ते स्वत:ला धन्य मानत राहिले आहेत.

नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवरही 5 कोटींचा असाच अनावश्यक खर्च करण्यात आला असून लोकहितापेक्षा उधळपट्टीकडेच त्यांचा नेहमी कल राहिला आहे. नगर परिषदेच्या टोलेजंग इमारतीत 100 अधिकारी-कर्मचार्‍यांना बसायला चांगली जागा मिळाली. मात्र, सिन्नरकरांना तेथे चांगल्या सुविधा कशा देता येतील, याचा विचार त्यांनी केला नाही.

या इमारतीने सिन्नरकरांच्या चकरा कमी केल्या नाहीत की त्यांची घरपट्टी कमी झाली नाही. ही इमारत बांधून नेमके त्यांनी सिन्नरकरांचे हित साधले की, स्वत:च्या मर्जीतल्या ठेकेदाराचे हित साधले, याचे आत्मपरीक्षण विकास पुरुषाने स्वत:च करायला हवे, असा टोला त्यांनी मारला. याऊलट आम्ही सत्तेवर येताच सिन्नरकरांची वाढलेली अवास्तव घरपट्टी कमी करून आमची बांधीलकी सिन्नरकरांशी व नगर परिषदेशी असल्याचे कृतीतून दाखवून दिले असल्याचे डगळे म्हणाले.

सिन्नर नगर परिषदेचा स्वत:चा दवाखाना सिन्नरकरांनी पै-पै जमवून बांधला होता. 1972 च्या दुष्काळात सिन्नरकरांना स्वस्तात धान्य मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या नफ्यातून कस्तुरबा गांधी प्रसूतीगृह बांधण्यात आले होते.

शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील महिलांना या प्रसूतीगृहाचा लाभ मिळत होता. थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या स्व. रामनाथशेठ चांडक यांनी दवाखान्याची नूतन इमारत बांधून दिली होती. मात्र, एक दिवस विकास पुरुषाच्या मनात आले आणि कुठलाही सारासार विचार न करता दवाखान्याच्या या दोन्ही इमारती त्यांनी जमीनदोस्त करून टाकल्या.

राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयांची तरतूद केली असताना सिन्नरकरांच्या डोळ्यात धूळफेक करीत सिन्नरकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजवण्याचे काम विकास पुरुषाने केले. नगर परिषदेच्या दवाखान्याकडे वैद्यकीय अधिकार्‍यापासून सर्व कर्मचारी असताना सिन्नरकरांच्या जीवाशी खेळण्याचे काम विकास पुरुषाने केले. चार-पाच वर्षे दवाखान्याची नवी इमारत बांधणे शक्य नाही, हे माहीत असतानाही स्वत:च्या अट्टाहासापायी सिन्नरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम त्यांनी केले.

शासनाकडून उपजिल्हा रुग्णालय मंजूर असताना यांच्या अट्टाहासाचा फटका पुन्हा नगर परिषदेला बसला असून या दवाखान्यावर दरवर्षी नगर परिषदेला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

सिन्नरकरांच्या सुख-दु:खाशी विकास पुरुषाला कधीही देणे-घेणे नव्हते. स्वत: पंधरा वर्षे आमदार असताना सिन्नर शहर दत्तक घेतल्याची घोषणा त्यांनी अनेकदा केली. मात्र, सिन्नरकरांना भौतिक सुविधा पुरवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न संधी असूनही त्यांनी कधीही केला नाही.

स्वत:ला विकास पुरुष म्हणवून घेणार्‍यांना सिन्नरकरांनी राजाभाऊ वाजे यांच्यासमोर 22 हजार मतांनी का पराभूत केले याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा टोला डगळे यांनी मारला. निवडणुका आल्या की, यांना सिन्नरकरांची आठवण येते. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चार वर्षे सिन्नरकरांच्या सुख-दु:खात सहभागी व्हायलाही यांना वेळ नव्हता.

चार वर्षे गायब असलेला विकासपुरुष निवडणूक लागताच सिन्नरकरांच्या पायर्‍या झिजवू लागला असून पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या काळात आपण काय दिवे लावले ते नुसत्या बोलबच्चन म्हणून मिरवणार्‍या विकासपुरुषाने आधी सिन्नरकरांना सांगावे व त्यानंतर लोकसभेचे गाजर सिन्नकरांना दाखवावे, असा सल्ला डगळे यांनी दिला.

सिन्नरच नव्हे तर संपूर्ण लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमी धावणारे हेमंत गोडसे हेच लोकसभेतून आमच्यापर्यंत विकासाची गंगा आणण्यासाठी सक्षम आहेत. आ. राजाभाऊ वाजे यांनी गेल्या साडेचार वर्षांत शहर व मतदार संघात केलेली विकासकामे खा. गोडसे यांना पुन्हा लोकसभेत पोहोचवतील, असा विश्वास डगळे यांनी व्यक्त केला.

सिन्नर नगर परिषदेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक खा. गोडसे यांच्या विजयासाठी संपूर्ण शहर पिंजून काढत असून विकासपुरुष असल्याचा डिंगोरा पिटणार्‍यांपेक्षा खर्‍या अर्थाने विकास काय असतो ते दाखवणार्‍या आ. वाजे आणि खा. गोडसे यांच्या पाठीमागेच सर्व सिन्नरकर उभे असल्याचे प्रचारात फिरताना स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

आज पालकमंत्र्याची सभा

खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज (दि.26) सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीएसएनएल कार्यालयासमोर होणार्‍या या सभेस म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, भाजप नेते पाशा पटेल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, ज्येष्ठ नेते गंगादादा वरंदळ, पदूकाका गुजराथी, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र कपोते, बाळासाहेब हांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहरप्रमुख गौरव घरटे यांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!