Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक फिचर्स ब्लॉग मुख्य बातम्या

‘वसुधैव कुटुंबकम्’ जगणारे, जागवणारे बिश्‍वरूप

Share

नि:स्वार्थ कार्य, प्रसिद्धी व पदाचा शून्य लोभ या अपवादाने आढळणार्‍या गुणांच्या बळावर बिश्‍वरूप राहा आपल्या भोवतालच्या असंख्य लोकांमध्ये कमालीचे विश्‍वासार्ह, प्रिय बनले. त्यांना जवळून ओळखणार्‍यांच्या तर गळ्यातले ताईत बनले. ‘बोरगड नॅचर रिझर्व्ह’ हे राहा यांचे नाशिकला देणे आहे. सध्या जैवविविधता संकटात आली आहे. अशा काळात ‘बोरगड नॅचर रिझर्व्ह’हे जैववैविध्याच्या सहअस्तित्वाचे देशाला आदर्शवत ठरावे असे उदाहरण आहे.

आमचे अत्यंत प्रिय मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ बिश्‍वरूप आता या भौतिक जगात नाहीत. तब्बल तीन महिने मृत्यूशी ते युद्ध खेळले. निकराची झुंज दिली… आणि अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. बिश्‍वरूप राहा… त्यांचे पूर्ण नाव, पण त्यांना कुटुंबातले सगळे आणि मित्रांच्या भल्यामोठ्या गोतावळ्यातलेही सगळेच शंखो म्हणून ओळखत.
माणसांची संख्या आज खूप झाली आहे, पण बिश्‍वरूप राहा उपाख्य शंखो हे खरोखर अपवाद म्हणावेत असेच होते. ‘रेड डेटा बुक’मध्ये धोक्यात आलेल्या पशुपक्ष्यांच्या जातींचा समावेश होतो. पृथ्वीवर अपवादाने उरलेल्यांचा समावेश प्राधान्याने असतो. माणसांमधल्या खर्‍या अर्थाने माणूस असलेल्यांचा अंतर्भाव (कारण असे कमीच उरलेले आहेत.) ‘रेड डेटा बुक’मध्ये केला गेला असता तर बिश्‍वरूप राहा यांना नक्कीच सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाली असती. खरे सांगायचे तर ते अपवादांंतही अपवाद होते.
राहा हे भोवतालाला समर्पित असे व्यक्तिमत्व होते. पक्षीप्रेमी, संरक्षणवादी,  छायाचित्रकार असे बरेच काही असलेले राहा हे नाशिकचे वैभव होते. ते रूढ अर्थाने ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर’ नव्हते. आपल्या भोवतालातील विशिष्ट वनस्पती आणि पक्षी, प्राणी यांना जेव्हा-जेव्हा ते ‘फोकस’ करीत आणि ‘फ्रेम’ करीत तेव्हा त्यामागे कार्यकारणभाव असे. कॅमेरा मिरवण्याची व नाव कमवण्याची हौस नावालाही नव्हती. त्या-त्या वनस्पती, पक्षी आणि प्राण्यांबद्दल एक आगळीच आणि केवळ करुणा त्यांच्या प्रत्येक ‘क्लिक’मागे असायची.
कुंभभूमीची त्यांनी मनोभावे सेवा केली. नाशिक, इथला एकूणच परिसर, परिसरातले पशू-पक्षी, वनस्पती म्हणजे जणू त्यांचे जगणे होते. कित्येक सत्रे ते नाशिकमध्ये मानद वन्यजीव वॉर्डन म्हणून कार्यरत राहिले. प्रत्येक सत्रातील त्यांचे प्रत्येक कार्य म्हणजे एक मानदंड! सरकारी शिरस्त्याच्या चौकटीत त्यांनी स्वत:ला कधीही बांधून घेतले नाही.
सांगण्याचें तात्पर्य हे की ते खर्‍या अर्थाने आपल्या प्रांतातले ‘बिश्‍वरूप’ होते. कुठलेही काम असो; शासकीय यंत्रणेच्या भरवशावर तर ते कधीही राहिले नाहीत. जवळपास एकट्यानेच सगळ्या गोष्टी हाताळल्या. अर्थात त्यांच्या या हातळणीलाही इकबाल यांच्या ‘मै तो अकेलाही चला था जानिब-ए-मंज़िल, मगर लोग आते गये और कारवॉं बनता गया…’ या ओळींचा अर्थ प्राप्त झाला होता.
बिश्‍वरूप राहा यांच्या समर्पणाचे तेज आणि वलयच असे काही होते की, पर्यावरणाला समर्पित कार्यकर्त्यांचे जाळे आपोआप त्यांच्याभोवती विणले गेले. महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्त्री-पुरूषच नव्हे तर अनेक शाळकरी मुलेही त्यांच्या पर्यावरण संरक्षणाच्या या चळवळीत सहभागी झाली. नाशिक जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यांतून जवळपास सर्वच शाळांंतील शिक्षक, मुले त्यांना ओळखत. आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळाही त्याला अपवाद नव्हत्या. हे उगाच घडले नाही.
आगामी काळात देशासाठी पर्यावरणपूरक पिढी घडवण्याचे काम त्यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील वनस्पती आणि प्राण्यांबद्दलची तसेच इथल्या खास आणि विशिष्ट वनसंपदेबद्दलची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून मुलांना देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. वनस्पती आणि पक्षी, प्राण्यांबद्दलचे ज्ञान त्यांनी मुलांना दिलेच, पण त्यांच्या शब्दांची खरी धडपड मुलांमध्ये पशू, पक्षी आणि वनस्पतींबद्दल प्रेम रुजवण्यासाठी असे. अस्मिता रुजवण्यासाठी असे.
बिश्‍वरूप राहा यांचे निसर्गावर अतिरेकी प्रेम होते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. इतके प्रेम की निसर्गाचा विध्वंस करणार्‍या माणसांच्या जातीतील आपणही एक आहोत याचा त्यांना न्यूनगंड वाटे. तरीही त्याचा राग त्यांनी माणसे म्हणून आपल्यावर धरला नाही, हे त्यांचे आपल्यावरले ऋणच! झाड जसे तोडायला आलेल्या माणसालाही सावलीच देते, तसे ते होते.
‘बोरगड रिझर्व्ह’चे काळजीवाहक, वनसंरक्षकांपासून ते शेकडो शाळकरी मुले कुणीही असो; त्यांच्या संपर्कात आला की, ओढला जात असे. बिश्‍वरूप राहा या नावातच वलय आहे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात तर खरोखरचे चुंबकीय वलय होते. कितीतरी मुलांना त्यांनी पर्यावरण संरक्षण, वनव्यवस्थापन या दुर्लक्षित शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहित केले.
बॉम्बे नॅच्युरल हिस्टरी सोसायटीचे ते नाशिक जिल्ह्यातील मुख्यालयच होते जणू! सोसायटीचे आणि सोसायटीसह असे कितीतरी उपक्रम त्यांनी इथे राबवले.  ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’चे उपक्रम असोत की, ‘एचएएल’चे किवा मग लांडग्यांचे ‘रेडिओ कॉलरिंग’ असो प्रत्येक उपक्रमात राहा हे शंभर टक्के समर्पित असत. स्वत:साठी अजिबात शिल्लक उरत नसत. ‘लांडग्यांच्या हालचालींचा रेडिओ कॉलरिंगच्या माध्यमातून करावयाचे अध्ययन’ या उपक्रमात तर तहानभूकही हरपलेले राहा सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. मला आठवते… ‘वसुधैव कुटुंबकम्’ या अर्थाने… याच उपक्रमातून लांडग्यांचे एक जोडपे जणू आमच्या दिवसागणिक विस्तारत चाललेल्या कुटुंबाचाच एक घटक बनून गेलेले… लांडग्याचे नाव आम्ही ‘अजय’ ठेवले होते आणि लांडगीचे ‘काजोल’!
नि:स्वार्थ कार्य, प्रसिद्धी व पदाचा शून्य लोभ या अपवादाने आढळणार्‍या गुणांच्या बळावर राहा आपल्या भोवतालच्या असंख्य लोकांमध्ये कमालीचे विश्‍वासार्ह, प्रिय बनले. त्यांना जवळून ओळखणार्‍यांच्या तर गळ्यातले ताईत बनले. ‘बोरगड नॅचर रिझर्व्ह’ हे राहा यांचे नाशिकला देणे आहे. सध्या जैवविविधता संकटात आली आहे. अशा काळात ‘बोरगड नॅचर रिझर्व्ह’हे जैववैविध्याच्या सहअस्तित्वाचे देशाला आदर्शवत ठरावे असे उदाहरण आहे. मला विचाराल तर विविध पशू, पक्षी आणि वनस्पतींच्या रूपातले ते राहा यांचे जिवंत स्मारकच आहे.
२००६ च्या सुमाराला त्याची मुहूर्तमेढ झाली. राहा यांनी त्यांच्या काही मित्रांसह पावसाळा सुरू झाला तसे इथे काही झाडे लावली. पावसाळ्यानंतरही पाठ फिरवली नाही. आई बाळाला भरवते तसे रोज प्रत्येक रोपाला पाणी आणि हवे ते दिले. हे सातत्याने सुरू राहिले. विस्तारत गेले.
झाडे जगली. मोठाली झाली. फांद्यांमध्ये मग खोपे आले. किलबिलाट आला. सुरवातीच्या त्या काळात फुलपाखराची, बेडकाची किंवा वनस्पतीची म्हणजे अगदी गवताचीही एखादी विशिष्ट अशी प्रजाती निदर्शनाला आली रे आली की, राहा जवळजवळ ‘युरेका युरेका’च्या थाटातच ओरडत असत. यावेळच्या आवाजातला त्यांचा उन्मेषी उत्साह मला आजही स्मरतो. आज बोरगड जसे वनराईने दाटलेले आहे, तशाच बिश्‍वजित यांच्या अनंत आठवणीही माझ्या मनात दाटलेल्या आहेत.
बिश्‍वरूप प्रेमळ होते तसे धाडसीही! एकदा बिश्‍वरूप आणि बिबट्या असा सामना कसा आणि किती जवळून झाला होता, त्याची बिश्‍वरूप यांनी सांगितलेली आठवण म्हणजे त्यांच्याबद्दलच्या आदराला दरार्‍याची जोड देणारी अशीच होती.
राहा हे माझे अत्यंत जवळचे मित्र! मी नाशिकला १९९० मध्ये स्थायिक झालो तेव्हापासूनचे. त्यांच्या मनाचे दार जसे खुले होते तसेच त्यांच्या घराचे दारही खुलेच असायचे. कुवारा होते.
मला इथे जम बसवायचा होता. आयुष्याची घडी बसवायची होती. म्हणजे माझे ते संघर्षाचे दिवस होते. संघर्षाच्या अनुषंगाने खस्ता खाव्या लागतात. नैराश्याचे मळभ पाठ सोडत नाहीत. अशा या सगळ्या वाळवंटी काळात राहा यांचे घर म्हणजे माझ्यासाठी प्रेरणेचे निवांत तळे होते. त्यांच्या माध्यमातून मला अनेक नवे मित्र मिळाले. मित्रांची एक मांदियाळीच तयार झाली. आम्ही मिळून किती भटकंती केली. ते सोबत असले म्हणजे दोन घास जास्तच जायचे. कितीतरीदा आम्ही सोबत जेवायचो तेव्हा.
नाशिक तेव्हा अर्थातच आजच्यापेक्षा वेगळे होते. इथले जगणेही अर्थात वेगळे होते, पण सुंदर होते. खरेतर ‘त्या काळात खूप मजा होती’, असे सगळेच जण आपापल्या भूतकाळाबद्दल बोलत असतात, पण मी तसे बोलत नाहीये. माझे जिवलग मित्र शंखो यांनी माझा तो काळ खरोखर सुंदर केला. समृद्ध केला. भोवतालाबद्दल मी साक्षर होतोच बर्‍यापैकी. त्यांनी मला संवेदनशील बनवून सोडले. चिमणपक्ष्यांकडे आणि गंगापूरच्या बगळ्यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही म्हणजे पाखरांवरली मायेची पाखरणच…!
गुड बाय दोस्ता…! जग पंखाक्रांत करणार्‍या फ्लेमिंगोज्समवेत तू मात्र हे जग सोडायला निघालायेस…  आम्हाला मात्र आशा आहे, अपेक्षा आहे तू येशील… गंगापूरला अधूनमधून…!
– रणजित प्रधान
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!