नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये पुणेकरांची संख्या चिंताजनक

सिन्नर | दि. २३ वार्ताहर

२२ मार्चला रात्री ९ वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला.  त्यानंतर मध्यरात्री मोठ्या शहरातील रहिवासी आपल्या गावाकडे शहर सोडून परतू लागले. त्यादरम्यान, पुण्याकडून नाशिककडे येणाऱ्या वाहनांचा ओघ मोठा होता. शिंदे टोल प्लाझा वर सोमवारी (दि. २३) मध्यरात्री १२ वाजेपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत २६८० वाहनांनी नाशिकमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये प्रवाशी वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती टोल प्रशासनाने देशदूतशी बोलताना दिली. यामध्ये पुणे पासिंगच्या वाहनांची आकडेवारी अधिक होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशाने जिल्हा सरहद्दीवरील सर्व प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत. आरोग्य, महसूल, ग्रामविकास व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी विशेष पथके या चेकपोस्टवर नियुक्त करण्यात आली आहेत.

सिन्नर तालुक्यात शिर्डी महामार्गावर वावी तर पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे येथे जिल्हा चेक पोस्ट कार्यान्वित असून नांदुर-शिंगोटे येथील चेक पोस्टवर पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या काळजी वाढवणारी असून जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांमध्ये पुणेकरांची आघाडी असल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून पर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर व पर्यायाने कोरोना संशयितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा सरहद्दीवर चेक पोस्ट कार्यान्वित केले आहेत. या चेक पोस्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी सहभागी आहेत. पोलीस यंत्रणेच्या मदतीने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व त्यामधील प्रवाशांची या चेक पोस्टवर कसून तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची स्वतंत्रपणे नोंद घेण्यात येत असून त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्दी,ताप, खोकला यासह संसर्गजन्य आजाराची लक्षणे पडताळून पहिली जात आहे. सिन्नरमध्ये शिर्डी महामार्गावर वावी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या चेकपोस्टवर अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील येणाऱ्या वाहनांची संख्या नगण्य असून नांदुर-शिंगोटे येथील चेकपोस्टवर मात्र कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या काळजी वाढवणारी ठरली आहे.

पुण्यातील स्थानिक प्रशासनाने तेथील नागरिकांना शहर सोडण्यात मनाई केली असली तरी प्रशासनाचे हे निर्देश धाब्यावर बसवत बहुतांश जण आपापल्या गावाकडे परतत आहे. त्यामुळे नाशिककडे येणाऱ्या वाहनांची वर्दळ दोन दिवसांपासून वाढल्याचे चित्र आहे. नांदुर-शिंगोटे येथील चेकपोस्टवर आज दि.23 सकाळपासून नाशिककडे येणाऱ्या शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात पुणे विभागातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे नोंदीवरून आढळून आले.

चेक पोस्टवर तैनात कर्मचाऱ्यांकडून वाहनाचा क्रमांक, वाहनातील प्रवासी संख्या, त्यांचे वास्तव्याचे ठिकाण व ते कुठे जात आहेत याचा तपशील नोंदवून घेतला जात आहे. होमक्वारेंटाईन शिक्का असलेल्या संशयितांचा देखील या मोहिमेत शोध घेतला जात आहे. मात्र दिवसभरात पुण्याकडून येणाऱ्या एकाही वाहनात होम होमक्वारेंटाईन कोरोना संशयित रुग्ण असल्याचा कुठलाही अधिकृत तपशील उपलब्ध झाला नाही. त्यामुळे यंत्रणांकडून सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे.

असे असले तरी नाशिककडे येणारा पुणेकरांचा ओघ प्रशासनाची व एकंदरीतच सर्वसामान्यांची काळजी वाढवणारा. अस हा ओघ आटोक्यात आणला नाही तर कोरोनाच्या संक्रमणाचा धोका नाशिककरांना ही पोहोचू शकतो याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मनुष्यबळ वाढवण्याची गरज

चेक पोस्ट वर आठ तासांच्या तीन शिप मध्ये तपासणीचे काम चालणार आहे. त्यासाठी तहसीदारांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांकडून कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. तहसीदार आणि मंडळ अधिकारी यांचे भरारी पथक चेक पोस्टवर नियंत्रण ठेवणार आहे. मात्र नांदूर शिंगोटे येथे असणारी वाहनांची लक्षणीय संख्या पाहता तापसणीकामी कर्मचारी वाढवण्याची गरज आहे.

हॅन्ड वॉश, सॅनिटायझर, मास्कची उपलब्धी

जिल्हा प्रशासनाने चेकपोस्ट वरील कर्मचाऱ्यांकडे हँडवॉश, सॅनिटायझर, मास्क, थर्मामीटर, हँड ग्लोज , पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावली, पिण्याचे स्वच्छ पाणी आदी सुविधा दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी वाहन तपासणी करतानाच अगोदर स्वतःची काळीज घ्यावी असे प्रशासनाने म्हटले आहे.

12 तासात 2700 वाहने नाशकात

शिंदे येथील टोलनाक्यावरून आज मध्यरात्री आज मध्यरात्री 12 वाजेपासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुमारे 2700 वाहने नाशिक शहरात प्रवेश करती झाली. या वाहनांमध्ये 2000 पेक्षा अधिक प्रवासी वाहनांचा समावेश असून त्यातही पुण्यात नोंदणी झालेल्या झालेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याचे टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com