Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : भद्रकालीत ईदचा ‘मीना बाजार’; सर्वधर्मियांची उसळते खरेदीसाठी गर्दी, घडते सामाजिक एकतेचे ‘दर्शन’

Share

जुने नाशिक ।  प्रतिनिधी

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जुने नाशिक येथील भद्रकाली, दूध बाजारातील रमजान ईदच्या खरेदीसाठीचा ‘मीना बाजार’ सुरू झाला असून रोज रात्री उशिरापर्यंत मोठ्याप्रमाणात गर्दी राहत आहे. शिरखुर्म्यासाठी लागणार्‍या विविध ड्रायफु्रटस्सह अत्तरे, कपडे, इस्लामी टोप्या यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लीम परिवार बाहेर पडत आहे.

रमजान ईद साजरी करण्यासाठी लागणार्‍या वस्तू एकाच बाजारात मिळतात, त्याला मीना बाजार म्हणतात. जुने नाशिकच्या फाळके रोड ते मेनरोड, भद्रकाली, दूध बाजार भागात हा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. पवित्र रमजानचे 27 रोजे पूर्ण झाले असून आता फक्त शेवटचे दोन किंवा तीन रोजे शिल्लक राहिले आहे.

यामुळे युद्धपातळीवर मुस्लीम बांधव ‘ईद-उल-फित्र’ सणाची खरेदीसाठी बाहेर पडत आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या बाजारात सध्या 600 ते 800 लहान-मोठे दुकाने आहेत़ यामध्ये चपलांंपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणार्‍या सर्व वस्तूंची दुकाने लावण्यात आली आहे.

यामध्ये स्थानिक व्यापार्‍यांसह बाहेरचे व्यापारीदेखील दुकाने लावून बसले आहेत. योग्य किमतीत भरपूर खरेदी मीना बाजारात करता येते. म्हणून शहरासह जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करीत आहे. शिरखुर्मा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफु्रट्सला यंदाच्या वर्षीही चांगली मागणी आहे.

बदाम, काजू, मावा, मनुके, पिस्ता, चारोळी, अक्रोड, मंगजबी, खारीक, अंजीर, खिसमिस, बडीशोेप, ईलायची, खसखस, शेवई आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्ग घरूनच यादी तयार करून येत आहे.

शेवईमध्ये अहमदाबादी, फेणी, मोगलाई आदींचा समावेश आहे. तर चुंबल, सुत्तरफेणीला देखील उत्तम मागणी असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

त्याचप्रमाणे केशर, नमकिन पिस्ता, जरदाळू, काला मनुका, अफगाण मनुका यालाही ग्राहकांची पसंती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रुट्सच्या किमतीत थोडीफार वाढ झाली असली तरी मागणीत मात्र घट नसल्याचे जाणवत आहे.


सुगंधी अत्तर, सुरमा, टोपी

ईदची नमाज पठण करण्यासाठी नवीन कपडे परिधान करुन त्यावर मुस्लीम बांधव सुगंधी अत्तर लावतात. त्याचप्रमाणे डोळ्या सुरमा घालतात व डोक्यावर इस्लामी टोपी घालून ईदगाह व मशिदीत जाऊन नमाजपठण करतात. म्हणून या वस्तुंच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सुगंधी अत्तरमध्ये दरबार, गुलाब, ग्रीन मुश्क, चॅलेंज, ओन्ली वन, गुलनाज, गुलमोहर, जंतुल फिरदोस, असिल, रॉयल प्रोफेसी, हुदा, मोगरा, केवडा आदी शेकडो प्रकारचे अत्तर सध्या मीना बाजारासह जुने नाशिकच्या विविध भागात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 20 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत अत्तराच्या बाटलीची किंमत आहे.


ज्वेलरीसाठी झुंबड…

ईदमध्ये महिलांना सजण्यासाठी आवश्यक असलेली ज्वेलरीची विक्री करण्यासाठी अनेक स्टॉल बाजारात आहेत. कानातील विविध फुले, गळ्यातील आकर्षक दागिने, हातातील बांगड्या, नेलपेंट आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सणाचे एक आकर्षण असलेली मेहंदी विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. अजेमरी, हीना, फिरदौस, नर्गिस, कॅटरिना, करिना, प्रेम दुल्हन आदी विविध प्रकारच्या मेहंदी कोन व सुटी मेहंदी उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत सर्वांसाठी बेल्ट, पॉकेट, गॉगल्स, चप्पल, बूट, सँडेल विक्रीचे स्टॉल असून महिलांची बांगड्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.


चोख बंदोबस्त

रमजान ईदनिमित्त मीना बाजार भरत आहे. बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस सातत्याने बाजारपेठेत फेरफटका मारत असतात. महिला पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. रस्त्यावर गर्दी झाली की; ती कमी करण्यासाठी पोलीस तत्काळ जागेवर पोहोचतात.


एकतेचे दर्शन

रमजान ईदमध्ये मीना बाजार ही ग्राहकांसाठी एक पर्वणी असते. या बाजारात नागरिक मनसोक्त खरेदी करतात. बाजारातील व्यापारी जास्तीचा नफा न पाहता एक भक्ती म्हणून व्यवसाय करतात. बाजारात फक्त मुस्लीमच नव्हे; तर सर्व धर्माचे लोक खरेदी करण्यासाठी येतात. तर दुकाने देखील मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधवांनी या ठिकाणी थाटली आहेत. यामुळे एकात्मतेचे दर्शन देखील होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!