Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पेट्रोलपंपावरील कामगाराच्या मदतीने रचला कॅशियरला लुटण्याचा कट; तिघांना बेड्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

मालेगाव शहरातील चंदनपुरी शिवारात असलेल्या सावकार पेट्रोल पंपावरील कॅशियर मालकाकडे पैसे घेऊन जात असताना त्याच्या मागावर असलेल्या पेट्रोल पंपावरील कामगाराच्या मदतीनेच कॅशियरला लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिक माहिती अशी की, कॅशियर राहुल पारख दिनांक 21 मार्च 2019 रोजी रात्रीच्या सुमारास दिवसभराचा हिशोब आटोपून 2 लाख 80 हजार रुपयांची रक्कम मालकाकडे घेऊन जात होते.  याच वेळी मंसुरा कॉलेज रोडवर शेतकी कॉलेज परिसरात अज्ञात 02 व्यक्तींनी मोटर सायकलवर पाठीमागुन भरधाव वेगाने येवुन काहीतरी लोखंडी वस्तुने फिर्यादी पारख यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर  त्यांच्या हातातील  2 लाख 80 हजार असलेली बॅग व एक सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकुण 02 लाख 85 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लुटला होता.

याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव शहरात गस्त घालत असतांना खब-यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित सुजन थिएटर परिसरात एका स्प्लेंडर दुचाकीवरून फिरत असल्याचे समजले त्यानुसार पथकाने मोसमपुल ते मनमाड चौफुली जाणारे रोडवर सुजन थिएटर परिसरात सापळा रचत 1) शेख अझरूद्दीन शेख शहाबुद्दीन, वय 20, रा. म्हाळदे शिवार, मालेगाव यास ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून एक हिरो स्प्लेंडर मोटर सायकल जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेले संशयितास पोलीस खाक्या
दाखविताच त्याने व त्याचा साथीदार 2) युसुफ भु-या (पुर्ण नाव माहिती नाही) व सावकार पेट्रोल पंपावरील काम
करणारा कामगार 3) अंकुश बापु वाघ, वय 22, रा.कुंजर, ता.चाळीसगाव, जि.जळगाव हल्ली चंदनपुरी शिवार
मालेगाव याच्यासह कट रचल्याची कबुली दिली.

यातील संशयित शेख अझरूद्दीन व युसूफ भु-या हे सुमारे दोन महिन्यांपुर्वी मालेगाव शहरातील  चंदनपुरी शिवारातील पेट्रोलपंपावर जात असत. तेव्हा त्यांची ओळख पंपावरील काम करणारा आकाश वाघ याच्याशी झाली.

पेट्रोलपंपावरील कॅशियर रोज रात्री जमा झालेले हिशोबाचे पैसे मालकाकडे घेवुन जात असल्याचे त्यांनी बघितले होते. याबाबत आकाशने वरील दोघा संशयितांना सांगितलेदेखील होते.

त्यानंतर कॅशियरला लुटण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार कॅशियर पंपावरून निघाल्याचे कामगार आकाश याने ठरल्याप्रमाणे दोघा संशयितांना मिस कॉल केला.

कॅशियर राहुल पारखचा निम्म्या रस्त्यातून संशयितांनी पाठलाग सुरु केला. त्यानंतर त्यास मंसुरा कॉलेजरोडवर शेतकी कॉलेज परिसरात गाठुन आरोपी युसूफ भु-या याने त्याचे डोक्यावर चाकुने प्रहार केला. त्यानंतर पारख दुचाकीवरून खाली कोसळला.

त्यानंतर दोघेही संशयित रोख रक्कमेची बॅग घेऊन पसार झाले. दरम्यान, तिघांनी चोरलेली रक्कम वाटून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यातील संशयितांचा साथीदार युसूफ भु-या हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरोधात मालेगाव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखा त्याची कसून चौकशी करत असून   आणखी गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सपोनि संदिप दुनगहू, सपोउनि सुनिल आहिरे, पोहवा सुहास छत्रे, वसंत महाले, पोना राकेश उबाळे, देवा गोविंद, पोकॉ फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, रतिलाल वाघ, दत्तात्रय माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!