Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

लक्ष्मीपूजनाला कळवण तालुक्यातून पुन्हा १०० ट्रॅक्टरची विक्रमी खरेदी

Share

नाशिक | प्रतिनिधी

दसऱ्याच्या मुहूर्तावर एकट्या कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी २५० ट्रॅक्टर, २१ कार आणि ४०० ते ५०० दुचाकींची विक्रमी खरेदी केल्यानंतर काल(दि.२७)  लक्ष्मीपूजनाला पुन्हा १०० पेक्षा अधिक ट्रॅक्टर आणि शेकडो दुचाकींची खरेदी येथील शेतकऱ्यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा कळवण तालुका चर्चेत आला आहे.

यंदा कांद्याला बाजारभाव चांगला असल्याने साठवणूक केलेल्या कांद्याला सोन्याचा भाव मिळाला आहे. कळवण तालुक्यात यावर्षी विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले होते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे यंदा कांद्याची साठवणूक अधिक होती. यामुळे दसरा आणि दिवाळीच्या वेळीच कांदा विक्री करून शेतकऱ्यांनी शेती उपयोगी, अवजारे, ट्रॅक्टरसह इतर वाहने खरेदी करण्याची लगबग सुरु केली.

गेल्या पाच वर्षांपासून १०० ते ५०० रुपये क्विंटलच्या दरम्यान राहणाऱ्या कांद्याच्या भावाने यंदा तब्बल दोन महिने दोन हजार ते चार हजार रुपये क्विंटल एवढा भाव दिल्याने जिल्ह्यात कांद्याचे सर्वात मोठे क्षेत्र असणाऱ्या कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे.

कळवणमधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या वाहनांमुळे बाजारपेठेत कुठलाही उत्साह नसताना चैतन्य निर्माण केले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी रोखीने कुणी बँकेच्या मदतीने तर कुणी पतसंस्थेकडून आर्थिक हातभार घेऊन वाहन खरेदी केले.

कांदा हे प्रमुख पीक असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या चार ते ५ वर्षांपासून नीचांकी दराने कांदा विकावा लागत होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, यावर्षी कांद्याने गेल्या दोन महिन्यांपासून चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले.

कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांकडे असलेल्या कांदा चाळींमुळे आजही शेतकऱ्यांकडे कांदा टिकून आहे. तर काही शेतकऱ्यांचा नवा कांदा बाजारात दाखल झाला असून त्यास चांगला भावदेखील मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्यासोबतच, रांगड्या(पावसाळी) कांद्याने हाथ लावल्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!