कांद्याला भाव न दिल्यास नेत्यांच्या सभा उधळून लावू; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

0

नाशिक । प्रतिनिधी 

सत्तेत असताना कांदा दर प्रश्‍नावर कोणत्याही पक्षाने तोडगा काढला नसून उत्पादकांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल भाव दिला जावा, अन्यथा आगामी काळात राजकीय पक्षांचा सभा उधळून लावू, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

सोमवारी (दि.11) पत्रकार परिषद घेऊन दिघोळे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे खंडेराव दिघोेळे, नितीन दिघोळे, सतीश दिघोळे, अतुल गीते उपस्थित होते. कांद्याला दोनशे रुपये अनुदान देऊन सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. सरकारने कांदा जीवनाश्यक वस्तूच्या यादीत टाकला आहे.

तसेच, कांदा निर्यात धोरणातील धरसोड वृत्तीमुळे उत्पादक संकटात सापडला आहे. केंद्रात व राज्यात सरकारे बदलत असतात. मात्र, एकाही पक्षाने कांदा प्रश्‍नावर तोडगा काढला नाही.

केवळ निवडणुकीपुरत शेतकर्‍यांचा वापर केला आहे. शेतकर्‍यांसाठी कांदा हे नगदी पीक असून सध्या कांद्याला दीड हजार क्विंटल रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. कांदा प्रश्‍न उत्पादकच सोडवू शकतात. त्यामुळे या प्रश्‍नावर आता आरपारची लढाई केली जाईल.

संघटनेच्या माध्यमातून सर्व प्रमुख राजकीय पक्ष प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे काद दराबाबत काय भूमिका आहे, हे विचारण्यात येईल. त्यांनी याबाबत ठोस आश्‍वासन न दिल्यास राजकीय नेत्यांच्या सभा उधळून लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कांदा उत्पादकांसाठी कॉल सेंटर

कांदा उत्पादकांना लागवड तंत्रज्ञान, काढणी, विक्री व्यवस्था, बाजार भाव , जवळचे मार्केट आदीबाबत इत्यंभूत माहिती देण्यासाठी संघटनेतर्फे लवकरच कॉल सेंटर सुरु केले जाईल, अशी माहिती दिघोळे यांनी दिली. तसेच, कांदयासाठी नवीन बाजारपेठा शोधणे, कांदा उत्पादकांची वर्षातून एकदा परिषद घेणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, बाहेरील देशात कांदा विक्री करणे, आदी विषयांवर काम सुरु केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*