Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कांद्याच्या दरातील घसरण सुरूच; दक्षिणेकडील राज्यातील नवा कांदा खातोय भाव

Share
नाशिक । अजित देसाई 
इजिप्तवरून आयात केलेला कांदा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायला झालेली सुरुवात, दक्षिणेकडील राज्यांमधील वाढलेली आवक, परतीच्या पावसाने नाशिक सह राज्यभरातील पिकाचे झालेले नुकसान व त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याची घसरलेली प्रत, व्यापाऱ्यांवर होणारी छापेमारीची कारवाई, शेतकऱ्यांकडील साठवणूक केलेला जुना कांदा संपत आल्याने  बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे.
एकाच दिवसात भावात झालेली सहाशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे. त्यातच नव्याने येणारा लाल कांदा तीन हजारावर स्थिरावला असल्याने या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
कांदयाच्या भावात झालेल्या वाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. किरकोळ बाजारात शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या कांद्यामुळे वांधा होऊ नये यासाठी सरकारने हस्तक्षेप करत निर्यातबंदी लादण्यासह व्यापाऱ्यांवर साठवणुकीसाठी मर्यादा आणल्या. पाठोपाठ परदेशातून कांदा आयातीला देखील प्रोत्साहन दिले.
याचा एकत्रित परिमाण होऊन सहा हजारांच्या घरात पोचलेले दर पाच हजारांच्या आत आले. यंदा आश्वासक भाव मिळतील या अपेक्षेने दिवाळी दणक्यात साजरी करण्याच्या शेतकऱ्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला. मात्र दरात झालेली घसरण शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ठरली.
बरोबरीनेच यंदाच्या पावसाळ्यांत झालेल्या नुकसानीचा देखील फटका कांदा उत्पादकांना सहन करावा लागला होता.
आता देखील शेतकऱ्यांची अवस्था आड कि विहीर अशीच आहे. कारण हाताशी असणारे पीक पावसाने धुऊन नेले. घरात साठवलेला कांदा संपल्यागत असून नुकताच काढलेला लाल कांदा पावसाच्या सततच्या माऱ्याने डागाळला आहे. परिणामी पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटल दरम्यान तो विकावा लागतो आहे.
दक्षिणेकडील कांद्याची बाजारात मागणी असल्याने त्याचा भाव वधारला असून त्या तुलनेत नाशिकमधील साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांकडील जुन्या कांद्याकडे व्यापाऱ्यांनी देखील पाठ फिरवली आहे. यातच व्यापाऱ्यांच्या  चौकशीचा ससेमिरा सरकारने लावला असून नको ती छापेमारी असे म्हणत व्यापाऱ्यांनी देखील खरेदीबाबत नमते घ्यायला सुरुवात केली आहे.
हि परिस्थिती पुढचे काही महिने अशीच राहणार असल्याने चिंता करण्याची वेळ जिल्हयांतील व राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. दोन दिवसांपूर्वी लासलगावला साडेपाच हजारांच्या घरात असलेले दर आज ४६०० रुपयांपर्यंत खाली आले असल्याने व ही घसरण वरील कारणामुळे काही अंशी सुरूच राहणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
उत्पादन घटण्याची भीती 
बाजारात येणारा नवीन लाल कांदा पावसामुळे काहीसा खराब आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित किंमत मिळत नाही. आज घडीला जुना साठवलेला कांदा देखील अवघा ५-१० टक्केच शिल्लक आहे. पावसाने रोपांचे मोठे नुकसान झाले असून दिवाळीनंतर लागवड केलेला कांदा चांगल्या प्रतीचा निघेल अशी परिस्थिती आहे. मात्र रोपे सडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आहे. सरकारच्या करवाईमुळे देशभरातील व्यापारी धास्तावले असल्याने खरेदीला हात आखडता घेतला जात असल्याचे नांदूरशिंगोटे (सिन्नर) येथील खरेदीदार देवराम केदार यांनी सांगितले.
मागणी-पुरवठ्याचे गणित व्यापारी जुळवत नाही 
साधारण पावसाळयाच्या काळात संपूर्ण देशाची मदार नाशिकवर अवलंबून असते. या काळात शेतकऱ्यांकडे साठवलेला गावठी कांदा बाजारातील गरज भागवतो. यंदा पावसाळा तब्बल साडेपाच महिने चालला. या काळात नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. परराज्यात देखील हीच परिस्थिती राहिली. अपेक्षित उत्पादन नाही व पावसाने कांद्याची प्रत घसरली असून टिकाऊपणा नसल्याने दूर पाठवता येत नाही.
गेल्यावर्षी गावठी किंवा उन्हाळ कांद्याला भाव कमी मिळविल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे मागणी व पुरवठयाचे गणित कोलमडून कांदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीसह व्यापाऱ्यांना साठवणुकीची मर्यादा घालून दिली. वास्तविक व्यापाऱ्यांवर बंधन घालणे चुकीचे आहे. कारण देशात जिथे जिथे कांद्याच्या खरेदीचे व्यवहार होतात तिथे प्रत्येक ठिकाणी लिलावाच्या वेळा वेगळ्या आहेत.
त्यामुळे मागणी व पुरवठ्याचे परिणामी भाव निश्चित करण्याचे गणित व्यापारी जुळवू शकत नाही अशी प्रतिक्रिया पिंपळगाव येथील विजय ट्रेडिंगचे रोहित ठक्कर यांनी दिली. आम्ही बाजार समितीच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतो. व्यापाऱ्यांची चौकशी न करता बाजार समितीकडून पडताळणी करावी असे ते म्हणाले. आम्ही पण सरकारला कर भरतो, त्यामुळे अविश्वास दाखवणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या हाती पैसे खेळावेत असे वाटत असेल तातडीने निर्यातबंदी उठवावी याकडे ठक्कर यांनी लक्ष वेधले.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!