गंजमाळ पंचशीलनगर येथे युवकाची धारदार शस्त्राने हत्या

0

नाशिक । दि. 10 प्रतिनिधी : पंचशीलनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती कार्यालयाजवळील परिसरात दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन झालेल्या हाणामारीत विशाल झाल्टे या युवकाची धारदार शस्त्राने वार करण्यात येऊन हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर संशयितास पोलिसांनी शिताफिने अटक केली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. काल (गुरुवारी) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाल झाल्टे (वय 22, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) हा रिक्षा चालवित असे.

रात्रीच्या सुमारास तो पंचशीलनगर चौकातून जात असताना कैलास शेजवळ (वय 40) याच्याशी झालेल्या बाचाबाचीतून कैलास याने विशालवर धारदार शस्त्राने शरीरावर तीन वार केले.

वर्मी घाव लागल्याने विशाल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला. यावेळी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने उपचार व्यर्थ ठरून त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भुजबळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी संशयित कैलास शेजवळ याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. शेजवळ हा वॉचमन म्हणून नोकरी करीत असल्याचे समजते.

रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. झाल्टे आणि शेजवळ हे दोघे शेजारी असून, महिलेच्या छेडखानीवरुन ही घटना घडल्याचे प्रथम दर्शनी तपासातून पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*