व्यावसायिकतेमुळे योगाचा प्रचार-प्रसार वेगात

0

नाशिक, दि.20, प्रतिनिधी – पूर्वी योगभ्यासाकडे फारसं गांभीर्याने कुणी पाहत नव्हतं परंतु सध्याच्या धावपळीच्या वातावरणात, वाढत्या ताणतणावात योगामुळे होणारे फायदे, आरोग्य सुदृढेतेसाठी होणारी मदत यामुळे योगाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे.

त्यातच योगामध्ये आलेली व्यावसायिकता, करिअरची नवी वाट म्हणून या क्षेत्राकडे पाहण्याचा तरूणांचा दृष्टीकोन यामुळे योगाचा प्रचार प्रसार वाढून त्याचे भविष्य उज्ज्वल होत असल्याचे योग विद्या धामचे योगाचार्य विश्वास मंडलिक सांगतात.

पूर्वी केवळ प्रौढ नागरिक योगाचा अभ्यास करीत असत. परंतु आता प्रोढांसह, लहान मुले, तरूण देखील योगाकडे आकर्षित होत आहेत. आज भारतासह 115 देशात योगाचे वर्ग घेतले जातात. सर्वांनाच योगाचे महत्व पटल्याने मोठया प्रमाणात योगशिक्षक तयार होत आहेत. नाशिकचा विचार करता आजमितीला सुमारे 800 योगशिक्षक ठिकठिकाणी योगाचे वर्ग घेतात. भारतात कर्नाटक, गुजरात, तसेच पूर्व भारतातही ठिकठिकाणी योग शिकवला जातो. तर संपूर्ण जगात 4 हजारहून अधिक योगशिक्षक योगाचा प्रचार प्रसार करीत आहेत.

केवळ चीन, अमेरिका, इंग्लड नव्हे तर पाकिस्तानातही योगाचा अभ्यास केला जातो हे विशेष. मुस्लीमधर्मिय बांधवांनी सुध्दा योग स्वीकारला आहे. योग हा धर्माशी नव्हे तर आरोग्याशी निगडीत आहे. त्यावर हिंदूत्वाचा शिक्का मारणं चुकीचं आहे असंही गुरूजी स्पष्टपणे सांगतात.

त्यामुळे प्रत्येकाने तो स्वीकारला तर त्यात लाभच आहे हानी कोणतीही नाही. आज योगाचा प्रचार प्रसार वेगाने होत असला तरी योगाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारया संस्था मात्र मुबलक प्रमाणत अस्तित्वात नाहीत. महाराष्ट्रात नागपुरमध्ये केवळ कालिदास संस्कृत विद्यापीठात योगा बी.ए., एम.ए, पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अन्य विद्यापीठात शारिरिक शिक्षण शाखेत एखादा विषय योगाअभ्यासावर आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठात योगाभ्यासाचे शिक्षण असणे आवश्यक आहे. भारतातही पतंजलि योग विद्यापीठ, बंगलोर तसेच उत्तरप्रदेशात काही ठिकाणी योगाचे उच्चशिक्षण दिले जाते.

केवळ सामान्य नागरिक नाही तर महिला, डॉक्टर, सैनिक, आयटी क्षेत्रातील तरूण, पोलिस, कायदेतज्ञ, राजकारणी, विविध संघटीत तसेच असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार, शासकीय अधिकारी-कर्मचारी अशा सर्वच वर्गात योगाचे महत्व पोहोचलेले आहे. योगा केल्याने त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला पहायला मिळाले आहेत. योगाचे महत्व लक्षात घेवून सरकारने स्वतंत्र ‘आयुष मंत्रालय’ सुरू करून त्या अंतर्गत विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

योगाभ्यासासाठी तसेच त्याच्या प्रचार प्रसारासाठी मोठया रकमेची तरतूद या मंत्रालयात आहे. परंतु दुर्देवाची बाब म्हणजे आता हे अनुदान लाटण्यासाठी विविध संस्थांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे कोणतेतरी योगशिक्षक नेमून त्यांच्याव्दारे कार्यक्रम राबवून अनुदान लाटण्याचे काम काही संस्थांकडून होते.

ही बाब गैर आहे. योगाचा ध्यास घेतलेले योगशिक्षकांची आज गरज आहे. सकारात्मतेमुळे योगाचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतु ही चळवळ आणखी तीव्र करण्यासाठी तळमळतेने काम करणारया योग अभ्यासकांची गरज आहे. या चळवळीला शास्त्रशुध्द रूप देण्याची आवश्यकता आहे. केवळ एक दिवस योग न राबविता कायमच योगासाठी तन्मयतेने काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकापर्यंत योग शास्त्रशुध्द पध्दतीने पोहचविण्याची गरज असल्याचेही योगाचार्य विश्वास मंडलिक सांगतात.

LEAVE A REPLY

*