वणी परिसरात टोमॅटो लागवडीस वेग

0

वणी । दि. 5 प्रतिनिधी
समाधानकारक पाऊस व अनुकुल वातावरणामुळे टोमॅटो लागवडीस वेग आला असुन निर्यातक्षम टोमॅटो लागवडीस उत्पादक अग्रक्रम देत आहेत.

द्राक्ष, ऊस , कांदा, टोमॅटो असे उत्पादन मोठया प्रमाणावर घेणार्‍या दिंडोरी तालुक्यात सध्या टोमॅटो लागवडीची लगबग सुरू आहे. पारंपारीक उत्पादनाची पध्दत बदलुन आधुनिक पध्दतीच्या लागवड उत्पादन प्रक्रियेस अग्रक्रम उत्पादक देऊ लागले आहेत. एक एकर शेती क्षेत्रात अंदाजे सहा हजार रोपांची लागवड़ करण्यात येते.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने 3 फुट रूंदीचा ओरंबा (बेड) पाडुन पाण्यासाठी ड्रीपचे पाइप पसरविण्यात येतात. त्यानंतर बेसलडोस (खते) टाकुन त्यावर मलचिंग पेपरला रोपांच्या लागवडीनुसार खड्डे करून त्यावर पसरविण्यात येतो अशी माहिती टोमॅटो उत्पादक तुषार देशमुख यांनी दिली.

एकरी सुमारे 10 हजार रुपये किमतीचा 30 मायक्रॉन जाडीचा आयात केलेला मलचिंग पेपर आच्छादित केल्याने अतिवृष्टीचा प्रतिकुल परिणाम होत नाही. झाडावर अतिरिक्त पाणी थांबत नाही.निंदणी करण्याची आवश्यकता राहत नाही त्यामुळे पैशांची बचत होते.

सुक्ष्म अन्नद्रव्ये खत स्वरूपातील द्रवपदार्थ झाडांच्या मुळाशी टाकणे सोपे जाते. दरम्यान एकरी लागवड ते उत्पादनाचा खर्च 50 हजाराच्या जवळपास येतो. लागवडीनंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर रोपांच्या दोन्ही बाजुस बांबु रोवण्याची प्रक्रिया करावी लागते अशी माहिती गोटुनाना देशमुख यांनी दिली.

रोपांची उंची 5 ते 6 फुट वाढ़ल्यावर बांबुना तार बांधुन रोपांना सुतळी बांधुन ताराना बांधण्यात येते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. नागपंचमी पासुन लागवड उत्तम मानन्यात येते.

अंदाजे उत्पादन सहा महीने सुरू राहते. दर 8 दिवसांनी खुडणी करण्यात येते एकरी 200 कॅरेटचे गणित उत्पादकांचे असते. हंगामाच्या कालावधीत गणित बदलले जाते.

निर्यातक्षम व दर्जेदार टोमॅटो गुजरात तसेच पाकिस्तानात मागणी असते अशी माहिती आबासाहेब देशमुख यांनी दिली. दरम्यान टोमॅटो हे अडीअडचणीच्या काळात हात देणारे पिक असल्याने तालुक्यातील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

*