सिन्नर: स्टेट बँकेजवळून लांबवले 1.64 लाख

0

सिन्नर : पन्नास रुपयांची नोट खाली पडल्याचे सांगत दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील 1 लाख 64 हजारांची रक्कम लांबवल्याची घटना आज (दि.27)दुपारी1.30 वाजेच्या सुमारास सिन्नर बसस्थानकासमोरील कमला मार्केट परिसरात घडली.

तालुक्यातील खोपडी येथील विजय उत्तम गुरुळे (34) यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 2 लाख 64 हजार रुपये काढले. दूध संकलन केंद्राची ही रक्कम होती. 2 लाख रुपये पॅन्टच्या ठेवून गुरुळे यांनी उरलेली रक्कम खिशात बसत नसल्याने सोबतच्या कापडी पिशवीत ठेवली.

बँकेतून बाहेर आल्यावर ते शेजारी असलेल्या कमला मार्केट समोर उभ्या केलेल्या आपल्या दुचाकीजवळ गेले. तेथे रोकड असलेली पिशवी त्यांनी दुचाकीला अडकवली. निघण्याच्या तयारीत असताना एक अनोळखी युवक त्यांच्या जवळ आला. बेमालूम पणे त्याने स्वतःजवळची 50 रुपयांची नोट खाली टाकत गुरुळे यांना तुमचे पैसे खाली पडल्याचे सांगितले. सुरुवातलीला दुर्लक्ष त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या गुरुळे यांना खरोखर खाली नोट पडली असल्याचे दिसले.

ती नोट उचलण्यासाठी ते खाली वाकले असतानाच ‘त्या’ युवकाने दुचाकीला अडकवलेली पिशवी लांबवत क्षणात पोबारा केला. खाली पडलेली नोट उचलून उभे राहिल्यावर दुचाकीला अडकवलेली पैशाची पिशवी व ‘तो’ युवक गायब असल्याचे पाहताच आपण फसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

परिसरात वर्दळ असताना ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही हे विशेष. याबाबाबत पोलिसांना कळवल्यावर शहर व परिसरात नाकाबंदी करून चोरट्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा माग लागला नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मगर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*