शिंदे टोलनाका प्रकरणी नाशिक ट्रान्सपोर्टकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

नाशिक,दि.१४ : नाशिक पुणे रोड़वरील सिन्नर ते नाशिक प्रवासादरम्यान शिंदे येथील अनाधिकृत व अन्यायकारक टोल वसूली तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीचे निवेदन नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक – पुणे महामार्गावरील सिन्नर ते नाशिक या प्रवासादरम्यानच्या शिंदे, ता.नाशिक येथील टोल नाक्यावर दि. १० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल शुल्क आकारणी सुरु करण्यात आली आहे.

सिन्नर – नाशिक रस्त्याचे बहुतांशी काम अपूर्ण आहे. टोल आकारणी केंद्र असलेले शिंदे गाव, बंगाली बाबा मंदिराजवळील पुलाचे काम तसेच चेहडीपासून पुढे नाशिक पर्यंतचे काम अपूर्ण असल्याने टोलवर शुल्क आकारणी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुठलाही शासन निर्णय नसताना अवैध स्वरुपात टोल वसूली सुरु करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

टोल आकारणी सुरु केली असली तरी अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशी परिस्थिती असतांना देखील टोल शुल्क वसुली करण्याची घाई करण्याचे कुठलेही कारण नाही. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाक्यावर शुल्क आकारणी सुरु करू नये अशी मागणी केली आहे.

तसेच टोल नाका येथील २० किलोमीटर परिसरातील गावातील स्थानिक वाहनांना, औद्योगिक वसाहतीतील वाहनांना टोलमधून मुक्ती द्यावी व तसेच येथील शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाना कुठलीही टोल वसूली करू नये.

टोल नाक्यावर नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवक व युवतींना प्राधान्य देण्यात यावे तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये, टोल नाक्यावरील अनधिकृत टोल वसूली तात्काळ थांबवून काम पूर्ण झाल्यानंतरच टोल वसूली करण्यात यावी अन्यथा नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून आंदोलन छेड़ण्यात येईल अशा इशाराही देण्यात आले आहे.

दरम्यान नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, नाशिकचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देखील सदर निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

*