निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरजवळ; सोहळ्यातील उभे रिंगण उत्साहात

0

करकंब / प्रतिनिधी, ता. २ :

अश्‍व धावे अश्‍वामागे|

वैष्णव उभे रिंगणी |

टाळ, मृदुंगा संगे|

गेले रिंगण रंगूनी ॥

आसमंत व्यापून टाकणारा टाळ, मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष आणि हरिनामात दंग होत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातील उभ्या रिंगणामध्ये अश्‍वांनी केलेल्या नेत्रदिपक दौडीमुळे लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

पहाटे श्री संत निवृत्तीनाथांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात येवून सोहळा करकंब मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अशा वातावरणात मुखी विठ्ठल नाम घेत टाळ, मृदुंगाच्या तालावर आनंदाने नाचत, गात सोहळा मार्गक्रमण करीत होता.

पंढरपूर आता अंतिम टप्प्यात आले होते. अशातच आज उभ्या रिंगणाचा सोहळा होता. त्यामुळे वारकर्‍यांना एक वेगळीच पर्वणी होती.

दुपारच्या नैवेद्य व विश्रांतीसाठी हा सोहळा परिते येथे पोहोचला. परिते ग्रामस्थांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सोहळ्याचे स्वागत केले.

विश्रांतीनंतर सोहळा उभ्या रिंगणासाठी करकंबच्या दिशेने मार्गस्थ झाला. रिंगण स्थळी सोहळा पोहोचताच चोपदारांनी दिंड्या लावून घेतल्या. या रिंगण सोहळ्यात प्रथम संस्थानच्या पताकाधार्‍यानी पहिली दौड घेवून उभ्या रिंगणास प्रारंभ केला.

टाळ, मृदुंगाच्या गजरात अश्‍वांनी उभ्या रिंगणाच्या दौडीस धाव घेतली. वारकर्‍यांची मोठ्या उत्साहात पखवाजावर आणि टाळावर थाप पडत होती. अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून उपस्थित वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगणानंतर सोहळा करकंबकडे मार्गस्थ झाला.

करकंब या ठिकाणी या सोहळ्याचे मोठ्या आनंदाच्या वातावरणात स्वागत झाले. पंढरपूर आता अंतिम टप्यात असल्याने सोहळ्याच्या मार्गावरती ग्रामस्थानी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. न्यू इंग्लिश स्कूल प्रशालाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची सूंदर अशी दिंडी या स्वागतासाठी तयार होती.

विठोबा मलाच मूळ धाडा |

धावत येईन दुडदुडा ॥

चरणी लोळेन गडगडा ॥

दरवर्षी गावामध्ये पाण्याचा सडा मारला जातो.

वारकर्‍यांनी अभंग म्हणून रस्त्यावर लोळत, चिखलाने माखत विविध खेळ खेळले.

अशा आनंददायी व मोठ्या उत्साही वातावरणात वारकर्‍यांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले.

करकंब येथे सोहळा पोहोचताच ग्रामस्थाच्या वतीने जि.प.सदस्य रजनीताई देशमुख, सरपंच आदिनाथ देशमुख, उपसरपंच राहुल पुरवत यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

समाजआरतीनंतर सोहळा करकंब मुक्कामी विसावला.  आज ( ता.२ ) हा सोहळा पांढरेवाडी, गुरसाळेमार्गे चिंचोलीकडे मार्गस्थ झाला आहे.

LEAVE A REPLY

*